Join us  

खूशखबर! ईपीएफओ देणार मोठं गिफ्ट, खातेधारकांना स्वेच्छेनं करता येणार पैशांची गुंतवणूक 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2018 5:50 PM

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी(ईपीएफओ)विभाग नववर्षाच्या निमित्तानं पाच कोटी जनतेला मोठं गिफ्ट देण्याच्या तयारीत आहे.

नवी दिल्ली- कर्मचारी भविष्य निर्वाह निधी(ईपीएफओ)विभाग नववर्षाच्या निमित्तानं पाच कोटी जनतेला मोठं गिफ्ट देण्याच्या तयारीत आहे. ईपीएफओनं एक नवा प्रस्ताव तयार केला असून, ज्याअंतर्गत ईपीएफओ खातेधारकांना स्वतःच्या मर्जीनं शेअर बाजारात गुंतवणूक करता येणार आहे. ईपीएफओ याशिवाय इतर सामाजिक सुरक्षा लाभ आणि निधी व्यवस्थापनासाठी डिजिटल माध्यमांसारखी सुविधा उपलब्ध करून देणार आहे. सद्यस्थितीत ईपीएफओ खातेधारांच्या जमा रकमेपैकी 15 टक्के रक्कम एक्सचेंज ट्रेडेड फंडा(ईटीएफ)मध्ये गुंतवणूक करत असते.आतापर्यंत अशा प्रकारे 55 हजार कोटी रुपये गुंतवणूक झाली आहे. परंतु ईटीएफमध्ये केलेली गुंतवणूक ही खातेधारकांना पाहता येत नाही. तसेच हे पैसे खातेधारकांना कुठेही गुंतवता येत नव्हते. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी(ईपीएफओ)विभागानं एक असं सॉफ्टवेअर विकसित केलं आहे, ज्यानं तुम्हाला हे पैसे शेअर बाजारात गुंतवता येणार आहेत. या सॉफ्टवेअरमध्ये सेवानिवृत्तीतल्या बचतीतले पैसे आणि ईटीएफनं गुंतवणूक केलेले पैसे वेगवेगळे पाहायला मिळणार आहेत.सध्या तरी खात्यात फक्त बचतीतले पैसे पाहायला मिळतात. ज्यात रोख रक्कम आणि ईटीएफसह इतर घटकांचा समावेश असतो. जेव्हा या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून आपल्याला रोख रक्कम आणि ईटीएफनं गुंतवलेली रक्कम वेगवेगळ्या स्वरूपात पाहायला मिळेल, तेव्हा आपल्याला शेअर बाजारात गुंतवणूक करता यावेत यासाठी पर्याय उपलब्ध करून देणार आहोत. या वर्षीच्या सुरुवातीलाच ईपीएफओच्या नेतृत्वाखालील केंद्रीय संचालक मंडळ(सीबीटी) शेअर बाजारात गुंतवणुकीचा पर्याय उपलब्ध करून देणार आहे. 

टॅग्स :भविष्य निर्वाह निधी