Join us  

कर्जाचा ईएमआय आणखी वाढला! मुदत ठेवींवरील व्याज वाढल्याने फायदा  

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2023 6:56 AM

रेपो दरात २.५० टक्क्यांच्या वाढीच्या पार्श्वभूमीवर बँकांनी आजवर ०.५९ टक्के अशा किरकोळ प्रमाणात का होईना; पण मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली. आता दोन वर्षांच्या कालावधीसाठी मुदत ठेवींचे दर ७.५ टक्के ते ज्येष्ठ नागरिकांसाठी ७.८५ टक्क्यांपर्यंत पोहोचले.

महागाई कमी करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने सलग सहाव्यांदा रेपो दरात ०.२५ टक्क्यांनी वाढ केली. यामुळे नवा रेपो दर ६.५० टक्के झाला आहे. दहा महिन्यांत व्याजदरात तब्बल २.५० टक्क्यांनी वाढ झाली. परिणामी गृह, वाहन तसेच वैयक्तिक कर्ज आणखी महाग झाले असून, ईएमआय आणखी वाढला आहे.चलनवाढ आटोक्यात आणण्यासाठी सतत दरवाढ केल्यानंतर त्याचे परिणाम महागाई आटोक्यात येण्याच्या रूपाने दिसत असून, बुधवारी झालेली दरवाढ ही नजीकच्या काळातील शेवटची दरवाढ असेल, असे मत अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. 

मे महिन्यापासून १० हजारांनी हप्ता वाढला - मे २०२२ मध्ये गृहकर्जाचे व्याजदर हे ७ टक्क्यांवर होते. तेव्हापासून रेपो दरात आतापर्यंत अडीच टक्के वाढ झाल्याने व्याजदर आता ९.५० टक्क्यांवर पोहोचले. मे २०२२ मध्ये ७० लाखांच्या गृहकर्जावरील मासिक हप्ता ५४,२७१ होता. तो आता ६५,२४९ रुपये इतका होईल. मेपासून आतापर्यंत १०,९७८ रुपयांनी मासिक हप्ता वाढला आहे.

मुदत ठेवींवरील व्याज वाढल्याने फायदा -रेपो दरात २.५० टक्क्यांच्या वाढीच्या पार्श्वभूमीवर बँकांनी आजवर ०.५९ टक्के अशा किरकोळ प्रमाणात का होईना; पण मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली. आता दोन वर्षांच्या कालावधीसाठी मुदत ठेवींचे दर ७.५ टक्के ते ज्येष्ठ नागरिकांसाठी ७.८५ टक्क्यांपर्यंत पोहोचले. दरवाढीनंतर मुदत ठेवी असलेल्या ग्राहकांना दिलासा देण्यासाठी मुदत ठेवींवरील व्याजदरात किरकोळ प्रमाणात वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

टॅग्स :बँकिंग क्षेत्रशक्तिकांत दासवार्ताहरभारतीय रिझर्व्ह बँक