Join us
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय व्यक्तींना कर्ज मिळण्यातील अडचणी दूर; आरबीआयने केवायसीसाठी व्याख्या बदलली; नियमांत स्पष्टता

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2024 09:59 IST

२५ फेब्रुवारी २०१६ रोजी केवाईसी नियमात लावण्यात आलेले एक उपकलम रिझर्व्ह बँकेने आता हटविले आहे. या बदलाची तत्काळ अंमलबजावणी करण्यात यावी, असे निर्देश रिझर्व्ह बँकेने देशातील सर्व बँका आणि वित्तीय संस्थांचे चेअरमन व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहेत.

मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) आपल्या मापदंडानुसार ‘राजकारणाशी संबंधित व्यक्ती’च्या (पॉलिटिकली - एक्स्पोज्ड पर्सन) व्याख्येत सुधारणा केली आहे. त्यामुळे राजकारणाशी संबंधित व्यक्तींना कर्ज घेण्यात तसेच विभिन्न बँकिंग व्यवहार करण्यात सुलभता येईल.

त्यासाठी रिझर्व्ह बँकेने केवायसी नियमात काही बदल केले आहेत. ‘राजकारणाशी संबंधित व्यक्तीं’विषयी आधीच्या नियमात अनेक बाबतींत स्पष्टता नव्हती. त्यामुळे बँक अधिकारी, खासदार आणि अन्य लोकांना अनेक बाबतीत समस्यांचा सामना करावा लागत होता. अनेकदा राजकीय व्यक्तींना कर्ज मिळविण्यात अडचणी येत होत्या. त्यावर तोडगा काढण्यासाठी आरबीआयने राजकारणाशीसंबंधित लोकांच्या केवायसी नियमांत सुधारणा केली.

अंमलबजावणीचे आदेश- सध्याच्या नियमानुसार, पीईपी व्यक्तींसाठी अतिरिक्त केवायसी मापदंड लागू होतो. बँकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यास याबाबत विशेष सावधानता बाळगावी लागत असे. 

- २५ फेब्रुवारी २०१६ रोजी केवाईसी नियमात लावण्यात आलेले एक उपकलम रिझर्व्ह बँकेने आता हटविले आहे. या बदलाची तत्काळ अंमलबजावणी करण्यात यावी, असे निर्देश रिझर्व्ह बँकेने देशातील सर्व बँका आणि वित्तीय संस्थांचे चेअरमन व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहेत.

कोणत्या व्यक्तींचा केला समावेश?सुधारित नियमानुसार, कोणत्याही अन्य देशाने प्रमुख सार्वजनिक कार्याची जबाबदारी दिलेल्या व्यक्तीस ‘राजकारणाशी संबंधित व्यक्ती’ (पीईपी) असे म्हटले जाईल. यात राज्ये आणि सरकारांचे प्रमुख, वरिष्ठ राजकीय नेते, वरिष्ठ सरकारी अधिकारी, न्यायिक अधिकारी, लष्करी अधिकारी तसेच सरकारी मालकीच्या कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी आणि प्रमुख राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांचा समावेश आहे. नव्या नियमात अशा व्यक्तींचाही समावेश करण्यात आला आहे, ज्यांना कोणत्या तरी अन्य देशाने सार्वजनिक समारोहाची जबाबदारी सोपविली आहे. 

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँकबँक