Join us  

इलेक्ट्रिक वाहने देणार ‘शॉक’; सुटे भाग महागल्याने किमती १० टक्क्यांपर्यंत वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2022 9:40 AM

इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती मागील काही वर्षांपासून सातत्याने कमी होत होत्या. मात्र, आता वाढत्या महागाईमुळे हा कल बदलला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली: इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती मागील काही वर्षांपासून सातत्याने कमी होत होत्या. मात्र, आता वाढत्या महागाईमुळे हा कल बदलला असून या वाहनांच्या किमती १० टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.

उत्तम दर्जाची बॅटरी, सुटे भाग आणि तंत्रज्ञान यावर होणारा कंपन्यांचा खर्च वाढला आहे. त्यामुळे वाहनांच्या किमतीही वाढतील. अनेक इलेक्ट्रिक वाहनांत आग लागण्याच्या घटना घडल्यानंतर बॅटरीच्या दर्जाबाबत सरकारने सक्ती सुरू केली आहे. युद्ध आणि चीनमधील कोरोनाची नवी लाट यामुळे बॅटरी सेलसह अन्य सुटे भाग महागले आहेत. या कारणांमुळे वाहनांच्या किमती वाढविण्यासाठी कंपन्यांवर दबाव आहे.

का वाढणार किमती?

आता इलेक्ट्रिक वाहनांत लिथियम आयन बॅटऱ्यांऐवजी फेरो फॉस्फेट बॅटऱ्या वापरल्या जाणार आहेत. त्यामुळे उत्पादन खर्च वाढेल. आगीच्या घटना रोखण्यासाठी बॅटरी मॅनेजमेंट सिस्टिम (बीएमएस) आणि आय कॅट अप्रूव्हल बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळेही खर्च वाढेल. ईव्ही उद्योग चीनवर अवलंबून आहे. चीनमध्ये लॉकडाऊन सुरू असल्यामुळे सुट्या भागांची टंचाई आहे. सुट्या भागांचे भावही त्यामुळे वाढले आहेत.

वाहन विम्याचे काय? : दुचाकी वाहनांना आग लागण्याच्या घटना घडल्यामुळे विमा दाव्यांत वाढ झाली आहे. त्यामुळे वाहन विम्याचा प्रीमियम वाढविण्याचा विचार विमा कंपन्या करीत आहेत.

ई-स्कूटर्स सुरक्षित बनविण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांमुळे खर्चात १० टक्के वाढ होणार आहे. त्यामुळे किमतींतही तेवढी वाढ होऊ शकते. - अर्पण अरोरा, संस्थापक, ईव्ही कंपनी टेनग्री

टॅग्स :इलेक्ट्रिक कार / स्कूटर