Join us
Daily Top 2Weekly Top 5

Edible Oil : खाद्यतेल झाले स्वस्त! मागणीत वाढ होऊनही किमती घसरल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2023 16:55 IST

Edible Oil : फेब्रुवारीमध्ये खाद्यतेलात 10 टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे. एका वर्षात ते 30 टक्क्यांपर्यंत स्वस्त झाले आहेत.

नवी दिल्ली : होळीच्या मुहूर्तावर खाद्यतेलाच्या महागाईपासून सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. मागणी वाढली असली तरी खाद्यतेलाच्या किमतीत घसरण होत आहे. खाद्यतेल स्वस्त होण्यामागचे कारण म्हणजे परदेशी बाजारात खाद्यतेलाच्या किमतीत झालेली घट तसेच देशांतर्गत तेलबियांचे उत्पादन वाढल्याचे सांगितले जाते. 

फेब्रुवारीमध्ये खाद्यतेलात 10 टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे. एका वर्षात ते 30 टक्क्यांपर्यंत स्वस्त झाले आहेत. गेल्या वर्षी या दिवसात मोहरीचे तेल 165 ते 170 रुपये लिटरने विकले जात होते, ते आता 135 ते 140 रुपये लिटरवर आले आहे. तसेच, रिफाइंड सोयाबीन तेलाचा भाव 140-145 रुपयांवरून 115-120 रुपये प्रति लिटर आणि सूर्यफूल तेलाचा दर वर्षभरात 135-140 रुपयांवरून 115-120 रुपयांपर्यंत खाली आला आहे.

आकडेवारीवर नजर टाकल्यास मोहरीचे तेल 10 टक्के, सोयाबीन तेल 3 टक्क्यांनी एका महिन्यात स्वस्त झाले आहे. आयात तेलांमध्ये, कच्च्या पाम तेलाच्या किमती वर्षभरात जवळपास 30 टक्क्यांनी घसरून 95 रुपये प्रति लिटर आणि आरबीडी पामोलिनच्या किमती जवळपास 25 टक्क्यांनी घसरून 100 रुपये प्रति लिटरवर आल्या आहेत. 

सेंट्रल ऑर्गनायझेशन फॉर ऑइल इंडस्ट्री अँड ट्रेडशी संबंधित व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की, होळीच्या दिवशी खाद्यतेलाची मागणी वाढली असली तरी त्यांच्या किमती कमी होत आहेत. कारण देशात तेलबियांचे बंपर उत्पादन अपेक्षित आहे आणि खाद्यतेल परदेशी बाजारपेठेतही स्वस्त आहे. दरम्यान, भारतातील खाद्यतेलाच्या किमती मोठ्या प्रमाणावर परदेशी बाजारांवर अवलंबून असतात कारण देशात त्यांचा वापर पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात खाद्यतेल आयात केले जाते. 

ऑल इंडिया एडिबल ऑइल ट्रेडर्स असोसिएशनशी संबंधित व्यावसायिकांचे म्हणणे आहे की, ब्राझील आणि अर्जेंटिनामधील सोयाबीन आणि मलेशियामध्ये पाम तेलाचे उत्पादन वाढण्याची शक्यता आहे. परदेशी बाजारात खाद्यतेलाच्या किमती नरमल्या आहेत. त्यामुळे देशात आयात केलेले तेल स्वस्त झाले आहे. याशिवाय, खरीप हंगामात देशात सोयाबीनचे उत्पादन जास्त होते. आता रब्बी हंगामात मोहरीचे विक्रमी उत्पादन अपेक्षित आहे. त्यामुळे देशात तेलबियांचे उत्पादन वाढल्याने खाद्यतेलाच्या किमती कमी होण्याचे वातावरण निर्माण झाले आहे.

टॅग्स :व्यवसाय