नवी दिल्ली : आयसीआयसीआय बँकेच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर व दीपक कोचर यांचे बंधू राजीव यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) पुढील आठवड्यात येथे चौकशीसाठी बोलावले आहे. याच बँकेत झालेल्या कर्ज घोटाळ्याशी संबंधित हवाला व्यवहारप्रकरणी (मनी लाँड्रिंग) त्यांची चौकशी होणार आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.अधिकारी म्हणाला की, चंदा कोचर यांना तीन मे रोजी तर दीपक कोचर आणि त्यांचे बंधू राजीव कोचर यांना ३० एप्रिल रोजी ईडीच्या चौकशी अधिकाऱ्यांपुढे हजर राहून हवाला व्यवहार प्रतिबंधक कायद्यान्वये आपले म्हणणे नोंदविण्यास सांगण्यात आले आहे. या सगळ्यांना गेल्या आठवड्यात समन्स बजावण्यात आले होते. चौकशी पुढे नेण्यासाठी या सगळ्यांनी चौकशी अधिकाºयांना साह्य करणे आवश्यक आहे, असे अधिकारी म्हणाला. वरील तिघांनाही त्यांच्या खासगी आणि अधिकृत आर्थिक व्यवहारांशी संबंधित विशिष्ट दस्तावेज सोबत घेऊन येण्यास सांगण्यात आले आहे. या हवाला व्यवहारप्रकरणी ईडीने एक मार्च रोजी धाडी घातल्यानंतर ईडीच्या मुंबईतील कार्यालयातही या तिघांची यापूर्वी चौकशी झाली आहे. चंदा कोचर, त्यांचे कुटुंब आणि व्हिडिओकॉन ग्रुपचे वेणुगोपाल धूत यांच्या मुंबई व औरंगाबादेतील ठिकाणांवर छापे घालण्यात आले होते. ईडीने यावर्षीच्या सुरुवातीला हवाला व्यवहार प्रतिबंधक कायद्याखाली चंदा कोचर, दीपक कोचर आणि धूत व इतरांवर फौजदारी गुन्ह्याची नोंद केली आहे. आयसीआयसीआय बँकेकडून १,८७५ कोटी रुपयांचे कर्ज व्हिडिओकॉन कंपनीला मंजूर करताना झालेली अनियमितता आणि भ्रष्ट मार्गांचा अवलंब यांची चौकशी केली जाणार आहे.प्रकरण काय?ईडीने केलेली ही कारवाई केंद्रीय गुप्तचर खात्याने (सीबीआय) दाखल केलेल्या गुन्ह्याच्या आधारे आहे.सीबीआयने तिघांची आणि व्हिडिओकॉन इंटरनॅशनल इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि व्हिडिओकॉन इंडस्ट्रीज लिमिटेडची नावे एफआयआरमध्ये घेतली आहेत.सीबीआयने धूत यांनी स्थापन केलेली सुप्रीम एनर्जी आणि दीपक कोचर यांच्या नियंत्रणातील न्यूपॉवर रिन्युएबल्स यांचीही नावे एफआयआरमध्ये घेतली आहेत.
चंदा कोचरांसह तिघांना ईडीने बजावले समन्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 03:46 IST