Join us  

‘कर्ज फेडण्याच्या प्रयत्नांना ईडीकडून विरोध’, माल्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2018 5:15 AM

कर्ज फेडण्याच्या सर्व प्रयत्नांना सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) विरोध केल्याचा दावा हजारो कोटींची फसवणूक करून परदेशात फरार झालेल्या विजय माल्याने सोमवारी विशेष पीएलएमए न्यायालयात केला.

मुंबई : कर्ज फेडण्याच्या सर्व प्रयत्नांना सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) विरोध केल्याचा दावा हजारो कोटींची फसवणूक करून परदेशात फरार झालेल्या विजय माल्याने सोमवारी विशेष पीएलएमए न्यायालयात केला. न्यायालयाने यावरील पुढील सुनावणी २८ सप्टेंबरला ठेवली आहे.माल्या सध्या यूकेमध्ये असून ईडीने त्याच्यावर बँकेचे नऊ हजार कोटी बुडविल्याबद्दल गुन्हा नोंदविला आहे. माल्याला ‘फरार आर्थिक गुन्हेगार’ म्हणून घोषित करावे व त्याची सर्व संपत्ती जप्त करण्याची परवानगी मिळावी यासाठी ईडीने काही आठवड्यांपूर्वी विशेष न्यायालयात अर्ज केला. त्या अर्जावर माल्याने विशेष न्यायालयात वकिलामार्फत सोमवारी उत्तर दिले.‘दोन-तीन वर्षांपासून बँकेचे कर्ज फेडण्याकरिता मी प्रयत्नशील आहे. ही प्रक्रिया सुलभ करण्याऐवजी ईडी प्रत्येक पावलावर विरोध करीत आहे,’ असा आरोप त्याने केला. फरार आर्थिक गुन्हेगार करण्याच्या ईडीच्या अर्जावर आक्षेप घेत माल्याने न्यायालयाला सांगितले की, यूकेत सुरू सुनावणीस मी सहकार्य करीत असल्याने भारतात परत येण्यास नकार देत आहे, असे म्हणणे अयोग्य ठरते. संबंधित देशाचा कायदा पाळल्याने मी ‘फरार आर्थिक गुन्हेगार’ ठरत नाही. यूकेत प्रत्यार्पणासंबंधीची सुनावणी पूर्ण झाली असून निकाल १० डिसेंबरपर्यंत राखून ठेवला आहे. त्यामुळे विशेष न्यायालयातील सुनावणीला स्थगिती द्यावी, अशी विनंती माल्याने केलीे. दरम्यान, काही लोकांनी या प्रकरणात प्रतिवादी करण्याबाबत केलेल्या अर्जावर ईडीने सोमवारी आक्षेप घेतला.

टॅग्स :विजय मल्ल्याबातम्या