Join us

अमेरीकेतील महागाई भारतासाठी डोकेदुखी! डिसेंबरचे आकडे भितीदायक; सामान्यांवर काय होईल परिणाम?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 11:21 IST

Usa Inflation Horror Story : महासत्ता अमेरीकेत महागाईने सामान्य माणूस हैराण झाला आहे. गेल्या महिन्यातील आकडेवारी धक्कादायक आहे. याचा थेट भारतावरही परिणाम होत आहे.

Usa Inflation Horror Story : महागाई भारतीय लोकांना नवीन नाही. इथं घरगुती गॅस सिलेंडरपासून इंधन दरवाढीपर्यंत सर्वांच्या किमती वाढतच चालल्या आहेत. आता महासत्ता असलेल्या अमेरिकेवरही हीच वेळ आली आहे. महागाईमुळे सर्वसामान्य अमेरिकन माणूस हैराण झाला आहे. त्याने खर्चात कपात करायला सुरुवात केली आहे. डिसेंबर २०२४ मध्ये ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) अपेक्षेपेक्षा जास्त वाढ दिसून आली. ऊर्जा उत्पादनांच्या किमतीत झालेली वाढ हे या वाढीचे प्रमुख कारण होते. वाढत्या किमतींचा परिणाम अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या व्याजदरात कपात करण्याच्या शक्यतांवरही झाला आहे. महागाई नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले जात असले तरी परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी वेळ लागू शकतो. याचा भारतावरही परिणाम होण्याची शक्यता आहे.

यूएस श्रम विभागाच्या आकडेवारीनुसार, डिसेंबर २०२४ मध्ये ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) ०.४% ने वाढला. नोव्हेंबरमध्ये ही वाढ ०.३% होती. वार्षिक आधारावर, डिसेंबरपर्यंत CPI २.९% ने वाढला, जो नोव्हेंबरमधील २.७% पेक्षा जास्त आहे. हे आकडे अर्थतज्ज्ञांच्या अपेक्षेच्या जवळपास आहेत.

महागाई नियंत्रणात येईना..२०२४ च्या उत्तरार्धात महागाई २% च्या लक्ष्यापर्यंत आणण्याची प्रक्रिया मंदावली. ऊर्जेच्या किमती तसेच संभाव्य आयात शुल्क आणि धोरणातील अस्थिरता यामुळे चलनवाढ नियंत्रित करण्याच्या प्रयत्नांना अडथळा निर्माण झाला आहे. डिसेंबर २०२४ मध्ये अन्न आणि ऊर्जेच्या किमती वगळता कोर CPI ०.२% वाढला. गेल्या ४ महिन्यांपासून त्यात सातत्याने ०.३% वाढ होत आहे. कोर CPI वार्षिक आधारावर ३.२% वाढला, जो नोव्हेंबरमध्ये ३.३% होता.

फेडरल बँकेची धोरणे आणि व्याज दरफेडरल रिझर्व्हच्या जानेवारी २०२५ च्या बैठकीत व्याजदरात कोणतीही कपात होण्याची शक्यता नाही. मात्र, यंदा आणखी कपात करण्याबाबत तज्ज्ञांमध्ये मतभेद आहेत. गोल्डमन सॅक्सने या वर्षात दोनदा व्याजदर कपातीची अपेक्षा केली आहे, तर बँक ऑफ अमेरिकाचा असा विश्वास आहे की व्याजदर कपातीचे चक्र संपले आहे.

भारतावर काय परिणाम होईल?अमेरिकेतील महागाई वाढल्याचा थेट परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर होत आहे. जेव्हा महागाई वाढते तेव्हा फेडरल रिझर्व्ह व्याजदर वाढवते, ज्यामुळे डॉलर मजबूत होतो आणि भारतीय रुपया कमजोर होतो. परिणामी कच्च्या तेलासह विविध वस्तूंची आयात भारतासाठी महाग होते. त्याचा फटका देशांतर्गत चलनवाढीच्या रूपाने भारतीय जनतेला बसतो. याशिवाय डॉलरच्या ताकदीचाही सोन्याच्या किमतीवर परिणाम होतो, ज्यामुळे भारतीय ग्राहक आणि ज्वेलरी उद्योगावर दबाव येतो.

उच्च व्याजदरांमुळे, परदेशी गुंतवणूकदार अमेरिकेत गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात, ज्यामुळे भारतीय शेअर बाजार आणि बाँड मार्केटमधील परदेशी गुंतवणूक कमी होऊ शकते. त्याच वेळी, अमेरिकेतील महागाईमुळे तेथील मागणीत घट झाल्यामुळे भारतीय निर्यातीवर, विशेषत: आयटी सेवा, औषधनिर्माण आणि कापड क्षेत्रावर नकारात्मक परिणाम झाला आहे. अशा प्रकारे, अमेरिकेच्या आर्थिक परिस्थितीचा भारताच्या व्यापार, गुंतवणूक आणि चलन विनिमय दरांवर खोल परिणाम होतो.

टॅग्स :महागाईअमेरिकाअमेरिकाडोनाल्ड ट्रम्प