Join us  

आर्थिक सर्वेक्षण अहवाल, शेतकऱ्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेला तारले; जीडीपी ११ % राहणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2021 4:20 AM

एकूण आर्थिक विकासात कृषी क्षेत्राचा वाटा वाढून १९.९ टक्के झाला आहे. नव्या संशाेधनाच्या बाबतीत भारत बराच पिछाडीवर आहे

नवी दिल्ली : संपूर्ण जगाला वेठीस धरणाऱ्या काेराेना महामारीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला सरत्या आर्थिक वर्षात खीळ बसली. मावळते वर्ष सर्वांसाठी वेदनादायी असले तरीही नव्या आर्थिक वर्षात आर्थिक विकास दर ११ टक्के राहण्याचा अंदाज आर्थिक सर्वेक्षणातून व्यक्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, सेवा आणि उत्पादन क्षेत्रांवर विपरीत परिणाम हाेत असताना कृषी क्षेत्र अर्थव्यवस्थेसाठी तारणहार ठरले आहे. तसेच नव्या कृषी कायद्यांचे सर्वेक्षणात समर्थन करण्यात आले आहे. लसीकरणाला गती मिळाल्यामुळे काेराेना महामारीतून देश झपाट्याने भरारी घेण्याची अपेक्षा सर्वेक्षणातून व्यक्त करण्यात आली आहे. 

प्रमुख आर्थिक सल्लागार व्यंकट सुब्रह्मण्यम यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेला आर्थिक सर्वेक्षण अहवाल अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेमध्ये मांडला. काेराेनामुळे जगभरातील अर्थव्यवस्था काेलमडली हाेती. भारतही त्यास अपवाद राहिलेला नाही. पतमानांकन संस्थांनीही भारताचे रेटिंग कमी करताना देशाचा आर्थिक विकास दर १० टक्क्यांनी घसरण्याचा अंदाज व्यक्त केला हाेता. मात्र, प्रत्यक्षात देशाची कामगिरी या संकटाच्या काळातही चांगली झाली आहे. मावळत्या आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक विकास दर ७.७ टक्क्यांनी घसरण्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षी एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीमध्ये आर्थिक विकास दर सर्वाधिक २३.९ टक्क्यांनी घटला हाेता. त्यानंतर ‘मिशन बिगिन अगेन’ अंतर्गत टप्प्याटप्प्याने सर्व क्षेत्रे खुली करण्यात आली. सप्टेंबरनंतर अर्थव्यवस्थेने फिनिक्स पक्ष्यासारखी भरारी घेतली आहे. आता येणारा काळ अर्थव्यवस्थेसाठी चांगला राहणार असून, आर्थिक विकासदर ११ टक्के राहील, असा अंदाज सर्वेक्षणातून व्यक्त करण्यात आला आहे. 

१९६०-६१ नंतर आतापर्यंत चार वेळा देशाची अर्थव्यवस्था आकुंचन पावली आहे. सर्वप्रथम १९६५-६६ आणि १९७१-७२ या युद्धाच्या काळात दाेन वेळा, त्यानंतर १९७९-८० या वर्षी भीषण दुष्काळ आणि आणीबाणीच्या परिणामामुळे आणि यंदा काेराेना महामारीमुळे नकारात्मक आर्थिक विकास दर राहिला आहे. यापैकी तीन वेळा घटलेले कृषी उत्पादन हे एक प्रमुख कारण राहिले आहे. मात्र, यंदा काेराेना महामारीच्या संकटात कृषी उत्पादनाने अर्थव्यवस्थेला तारले आहे. व्यापार आणि उद्याेगधंदे अपेक्षेपेक्षा कमी कालावधीत सर्वसामान्य पातळीवर आले. तसेच सणासुदीच्या काळात वाढलेल्या मागणीचाही अर्थव्यवस्था उभारणीसाठी लाभ झाला, असे सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे. 

कृषी क्षेत्राचा वाटा वाढला

डबघाईला आलेल्या अर्थव्यवस्थेला कृषी क्षेत्राने खऱ्या अर्थाने तारले आहे. एकीकडे सेवा आणि औद्याेगिक क्षेत्रांनी नकारात्मक वाढ नाेंदविली असतानाच कृषी क्षेत्राने मावळत्या आर्थिक वर्षात ३.४ टक्के विकास दर नाेंदविला. एकूण आर्थिक विकासात कृषी क्षेत्राचा वाटा वाढून १९.९ टक्के झाला आहे. नव्या संशाेधनाच्या बाबतीत भारत बराच पिछाडीवर आहे. जगातील पहिल्या दहा अर्थव्यवस्थांशी तुलना केल्यास या क्षेत्रावर देशातील खर्च अत्यल्प आहे. त्यामुळे भारताने संशाेधन आणि विकासावर एकूण जीडीपीच्या १.५ ते ३ टक्क्यांपर्यंत खर्च वाढविला पाहिजे, असे सर्वेक्षणात म्हटले आहे. 

टॅग्स :शेतकरीबजेट 2021