Join us  

वाहन उद्योगाचे बुरे दिन कायम; सलग दहाव्या महिन्यात विक्रीत घट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2019 4:45 PM

वाहन निर्मिती क्षेत्रातील कंपन्यांसमोरील अडचणी वाढल्या

नवी दिल्ली: वाहन क्षेत्रातील मंदीचं संकट आणखी गहिरं झालं आहे. सलग दहाव्या महिन्यात वाहनांच्या विक्रीत घट झाली आहे. वाहन निर्मिती कंपन्यांची संघटना असलेल्या सियामनं दिलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या ऑगस्टच्या तुलनेत यंदाच्या ऑगस्टमध्ये विक्रीत प्रचंड घट झाली आहे. वाहन निर्मिती क्षेत्रातील जवळपास सर्वच कंपन्यांची विक्री घटली आहे. यापैकी अनेक कंपन्यांनी काही दिवसांसाठी उत्पादन बंद ठेवण्याचा निर्णयदेखील घेतला आहे.ऑगस्ट 2018 मध्ये 2,87,198 प्रवासी वाहनांची विक्री झाली होती. यंदाच्या ऑगस्टमध्ये हा आकडा थेट 1,96,524 वर घसरला. ही घट तब्बल 31.57 टक्के इतकी आहे. चिंतेची बाब म्हणजे सर्वच प्रकारच्या वाहनांची विक्री घटली आहे. सियामच्या आकडेवारीनुसार, गेल्या ऑगस्टमध्ये देशात 1,96,847 कार विकल्या गेल्या होत्या. मात्र यंदा ऑगस्टमध्ये 1,15,957 कार्सची विक्री झाली. गेल्या ऑगस्टच्या तुलनेत यंदा कारची विक्री 41.09 टक्क्यांनी घटली आहे. दुचाकींची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनादेखील आर्थिक मंदीचा फटका बसला आहे. गेल्या ऑगस्टमध्ये देशात 19,47,304 दुचाकींची विक्री झाली होती. यंदाच्या ऑगस्टमध्ये हा आकडा 15,14,196 वर आला. म्हणजेच दुचाकींची विक्री 22.24 टक्क्यांनी घटली आहे. व्यावसायिक वाहनांच्या विक्रीतील घटदेखील कायम आहे. गेल्या ऑगस्टच्या तुलनेत यंदाच्या ऑगस्टमध्ये व्यावसायिक वाहनांच्या विक्रीत 38.71 टक्क्यांनी घट झाली आहे. तर अवजड वाहनांच्या विक्रीत तब्बल 54.3 टक्क्यांची घट पाहायला मिळाली आहे.  

टॅग्स :वाहन उद्योगअर्थव्यवस्था