EaseMyTrip slams MakeMyTrip : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्षाच्या काळात तुर्कस्तान आणि अझरबैजानने पाकिस्तानला पाठिंबा दिला होता. या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिक या दोन्ही देशांवर बहिष्कार टाकत आहेत. याच दरम्यान, ट्रॅव्हल बुकिंग प्लॅटफॉर्म EasyMyTrip चे सीईओ निशांत पिट्टी यांनी एक गंभीर आरोप केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, सवलतीच्या नावाखाली भारतीय सैनिकांचा डेटा चीनपर्यंत पोहोचवला जात आहे. यामुळे सोशल मीडियावर नवीन वादाला तोंड फुटले आहे.
काय आहे निशांत पिट्टी यांचा आरोप?निशांत पिट्टी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (ट्विटर) वर पोस्ट करत आरोप केला आहे की काही ट्रॅव्हल कंपन्या भारतीय जवानांना विमान तिकीटांवर सवलत देत आहेत. या कंपन्यांमध्ये चीनची मोठी गुंतवणूक आहे आणि त्यामुळे भारतीय सैनिक कुठे प्रवास करत आहेत, त्यांच्या ओळखपत्राची माहिती, प्रवासाचा मार्ग आणि तारीख यांसारख्या संवेदनशील गोष्टी चीनपर्यंत सहज पोहोचत आहेत. पिट्टी यांनी थेट नाव न घेता MakeMyTrip वर निशाणा साधला आहे.
MakeMyTrip चा इन्कारपिट्टी यांच्या आरोपांना उत्तर देताना MakeMyTrip ने म्हटले आहे की त्यांची कंपनी पूर्णपणे भारतीय आहे. अशा वाईट हेतूने केलेल्या आरोपांना ते महत्त्व देत नाहीत. कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की त्यांची कंपनी भारतीयांनी स्थापन केली आहे, त्यांचे मुख्यालय भारतात आहे आणि ते गेल्या २५ वर्षांपासून ग्राहकांना सेवा देत आहेत. त्यांचे भागधारक जगभरात असले तरी, ते सर्व भारतीय कायद्यांचे आणि डेटा गोपनीयतेच्या नियमांचे पालन करतात.
पिट्टींनी सादर केले पुरावेMakeMyTrip च्या या उत्तरावर निशांत पिट्टी म्हणाले की राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर ते गप्प बसणार नाहीत. त्यांनी MakeMyTrip च्या शेअरहोल्डर्सचे स्क्रीनशॉट शेअर केले. आणि दावा केला की MakeMyTrip च्या १० बोर्ड संचालकांपैकी ५ जण चीनचे आहेत, ज्यांना चीनमधील Trip.com या कंपनीने नियुक्त केले आहे.
चीनचा पाकिस्तानला पाठिंबाभारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्षात चीनने नेहमीच पाकिस्तानला पाठिंबा दर्शवला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेकदा चीन पाकिस्तानच्या बाजूने उभा राहिला आहे. या भूमिकेमुळे भारतातील अनेक लोक चीनच्या विरोधात आहेत आणि आता भारतीय सैनिकांच्या डेटाच्या कथित गैरवापरात चिनी कंपन्यांचा सहभाग असल्याच्या आरोपांमुळे हा विरोध अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
वाचा - आम्ही भारतात गुंतवणूक करतच राहू; भारत सरकारला.., Apple चा ट्रम्पना मोठा झटका
सध्या निशांत पिट्टी यांनी केलेले हे आरोप आणि MakeMyTrip ने दिलेले स्पष्टीकरण यामुळे सोशल मीडियावर एक नवीन वाद सुरू झाला आहे. या प्रकरणाची सत्यता आणि याचा भारतीय सैन्याच्या सुरक्षेवर काय परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे असेल.