Join us

Rapido मुळे अचानक Swiggy कडे आले २४०० कोटी रुपये, नक्की काय आहे प्रकरण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 11:07 IST

Swiggy Rapido Deal: फूड डिलिव्हरी कंपनी स्विगीनं (Swiggy) एक मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे स्विगीच्या खात्यात तब्बल २४०० कोटींची रक्कम येणारे.

Swiggy Rapido Deal: फूड डिलिव्हरी कंपनी स्विगीनं (Swiggy) एक मोठा निर्णय घेतला आहे. स्विगी आता बाइक टॅक्सी स्टार्टअप रॅपिडोमधील (Rapido) आपला हिस्सा विकत आहे. कंपनीच्या बोर्डानं या विक्रीला मंजुरी दिली आहे. या करारामुळे स्विगीला अंदाजे २४०० कोटी रुपये मिळतील. रॅपिडोनं फूड डिलिव्हरी व्यवसायात प्रवेश केल्यामुळे स्विगीनं हा निर्णय घेतल्याचं मानलं जात आहे.

शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, स्विगी रॅपिडोचे १० इक्विटी शेअर्स आणि १,६३,९९० सिरीज डी कंपल्सरी कन्व्हर्टिबल प्रेफरन्स शेअर्स प्रोससच्या (Prosus) सहयोगी कंपनी एमआयएच इन्व्हेस्टमेंट्स वनला (MIH Investments One) विकेल. हा करार १,९६८ कोटी रुपयांचा असेल. याव्यतिरिक्त, स्विगी वेस्टब्रिज कॅपिटलच्या सेतू एआयएफ ट्रस्टला (Setu AIF Trust) ३५,९५८ प्रेफरन्स शेअर्स विकेल. यातून स्विगीला ४३१.५ कोटी रुपये मिळतील. हा निर्णय भागधारकांच्या फायद्यासाठी घेण्यात आल्याचं स्विगीनं म्हटलंय. कंपनीला आपली गुंतवणूक रोखीत रूपांतरित करायची आहे.

शेअर बाजार पुन्हा घसरला, सेन्सेक्स १४७ अंकांनी आपटला; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण

निर्णयाच्या विरुद्ध विक्री

ही विक्री स्विगीच्या २०२२ च्या निर्णयाच्या अगदी उलट आहे. तेव्हा स्विगीनं रॅपिडोमध्ये १८० मिलियन डॉलर्सची गुंतवणूक केली होती. त्यावेळी रॅपिडोचे मूल्यांकन सुमारे ८०० मिलियन डॉलर्स होतं. स्विगीने त्यावेळी सांगितले होते की, या गुंतवणुकीमुळे त्यांच्या डिलिव्हरी फ्लीटसाठी आणि रॅपिडोच्या कॅप्टन्ससाठी कमाईच्या संधी वाढतील. त्यावेळी रॅपिडोकडे २.५ कोटींहून अधिक ग्राहक आणि १५ लाख कॅप्टन्स होते. कंपनी लहान शहरांमध्ये आपली पकड मजबूत करू इच्छित होती.

टॅग्स :स्विगीव्यवसाय