Join us  

पाच वर्षांत देशातील गुंतवणुकीत दुप्पटीने वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2019 9:01 PM

देशात २०१०-१४मध्ये झालेल्या नव्या गुंतवणुकीच्या तुलनेत २०१५-१९मध्ये झालेल्या नव्या गुंतवणुकीत दुप्पटीने वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे.

 मुंबई - देशात २०१०-१४मध्ये झालेल्या नव्या गुंतवणुकीच्या तुलनेत २०१५-१९मध्ये झालेल्या नव्या गुंतवणुकीत दुप्पटीने वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, नव्या गुंतवणुकीसाठी देशात आलेल्या मोठ्या २५३ नव्या प्रकल्पांपैकी २१८ प्रकल्प हे खासगी मालकीचे आहेत. प्रोजेक्ट्स टुडेने देशातील प्रकल्प गुंतवणुकीबाबत जाहीर केलेल्या ७४व्या सर्वेक्षण अहवालात ही माहिती प्रसिद्ध केली आहे.

या अहवालानुसार, २०१५-१९ या पाच आर्थिक वर्षांत देशात एकूण ४७ हजार ९११ नवे प्रकल्प जाहीर करण्यात आले. त्या माध्यमातून देशात ६० लाख ५१ हजार २८१ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची घोषणा झाली आहे. याआधी २०१०-१४ या पाच वर्षांत २९ लाख २८ हजार १२५ कोटी रुपयांची गुंतवणूक करणाºया ४३ हजार ८७६ नव्या प्रकल्पांची घोषणा झाली होती. त्यामुळे आधीच्या पाच वर्षांच्या तुलनेत २०१५-१९मध्ये लहान-मोठ्या अशा एकूण ४ हजार ०३५ प्रकल्पांनी वाढ झाली आहे.

उत्पादन, खाणकाम, पायाभूत सुविधा, सिंचन या क्षेत्रांमधील गुंतवणुकीत १०० टक्क्यांहून अधिक वाढ झाली असली, तरी विद्युत क्षेत्रातील गुंतवणुकीत मात्र घट नोंदवण्यात आली आहे. ३१ मार्च २०१९ रोजी संपलेल्या पाच वर्षांच्या कालावधीत उत्पादन व सिंचन क्षेत्रांमध्ये नव्या प्रकल्पांची घोषणा होण्याची संख्या तुलनेने कमी होती. यामध्ये १ हजार कोटींहून अधिक गुंतवणूक असलेल्या उत्पादन क्षेत्रातील प्रकल्पांमध्ये ७ लाख ७२५ कोटींवरून १६ लाख १५ हजार ४५६ कोटी रुपयांपर्र्यंत गुंतवणूक वाढली आहे. त्यामुळे पाच वर्षांत झालेल्या एकूण गुंतवणुकीच्या २६.७ टक्के वाटा उत्पादन क्षेत्राने उचलला आहे. याशिवाय खत, स्टील, सिमेंट, रिफायनरी व इलेक्ट्रॉनिक्स या क्षेत्रांमधील गुंतवणुकीत वाढ नोंदवण्यात आली आहे.

कुठे वाढ, कुठे घट?

पायाभूत सुविधा क्षेत्रामध्ये झालेल्या गुंतवणुकीत ११ लाख ४६ हजार २०८ कोटींवरून ३४ लाख ०९ हजार ३०० कोटी रुपयांपर्यंत वाढ झाली आहे.

वाहतूक सुविधा व सामाजिक पायाभूत सुविधा यांचा समावेश असलेल्या क्षेत्रात ३३ हजार १४५ प्रकल्पांमध्ये ३९ हजार ५०९ प्रकल्पांपर्यंत वाढ झाली आहे.

रस्तेमार्गांमध्ये ३ लाख ६४ हजार ८०९ कोटींवरून तबब्ल ११ लाख २४ हजार ९९६ कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक वाढीची घोषणा झाली आहे.

बांधकाम क्षेत्रामध्ये गुंतवणूक करणाºया नव्या प्रकल्पांच्या संख्येत घट झाली आहे. मात्र प्रकल्प संख्या घटल्यानंतरही या क्षेत्रात २ लाख १८ हजार ४३९ कोटींवरून ६ लाख ४२ हजार ६५७ कोटी रुपयांपर्यंत गुंतवणुकीत वाढ नोंदवण्यात आली आहे.

 

ऊर्जा क्षेत्रातील गुंतवणूक घसरली!

ऊर्जा क्षेत्रामध्ये ७ लाख ९० हजार २२७ कोटी रुपयांवरील गुंतवणूक गेल्या पाच वर्षांत २ लाख १९ हजार ५६८ कोटी रुपयांपर्यंत घसरली आहे. धक्कादायक बाब म्हणजे याआधीच्या पाच वर्षांत ६३९ नव्या प्रकल्पांची घोषणा झाली होती, मात्र गेल्या पाच वर्षांत केवळ ९८ नव्या प्रकल्पांची घोषणा झाली आहे.दरम्यान, अपारंपरिक ऊर्जा प्रकल्पांतील गुंतवणूक ९२ हजार ७६० कोटींवरून ३ लाख ६५ हजार ९५३ कोटींपर्यंत वाढली आहे.

 

सिंचनातील गुंतवणूक दुप्पटीने वाढली

सिंचन क्षेत्रातील एकत्रित नवी गुंतवणूक आर्थिक वर्ष २०१०-१४ या कालावधीतील ५७ हजार ९३४ कोटी रुपयांवरून आर्थिक वर्ष २०१५-१९मझ्ये १लाख ९८ हजार ८६९ कोटी रुपये झाली. या क्षेत्रामध्ये मध्य प्रदेश, राजस्थान व तेलंगणा सरकार हे मोठे गुंतवणूकदार होते. 

टॅग्स :अर्थव्यवस्थाभारत