Join us

केवळ कॉल करणाऱ्यांवर डेटापॅकची सक्ती नको; ट्रायचे मोबाइल सेवा कंपन्यांना आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2024 11:17 IST

ट्रायने ९० दिवसांचे विशेष रिचार्ज कुपन हटवून त्यास ३६५ दिवसांपर्यंत वाढविले आहे.

नवी दिल्ली: इंटरनेट डाटाचा वापर न करणाऱ्या ग्राहकांसाठी केवळ व्हॉइस कॉल आणि एसएमएस यांच्यासाठी रिचार्ज कुपन जारी करण्याचे आदेश 'भारतीय दूरसंचार नियामकीय प्राधिकरणा'ने (ट्राय) सोमवारी दिले, याशिवाय ट्रायने ९० दिवसांचे विशेष रिचार्ज कुपन हटवून त्यास ३६५ दिवसांपर्यंत वाढविले आहे.

४जी आल्यानंतर देशात मोबाइल इंटरनेट सेवेचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला. गावोगावी आणि घरोघरी स्मार्टफोनद्वारे इंटरनेटचा वापर होऊ लागला. मात्र, या धामधुमीत कंपन्यांनी केवळ व्हॉइस कॉल व एसएमएसची सुविधा असलेले रिचार्ज कुपन्स हटवून टाकले. केवळ डाटा पॅकच ग्राहकांना उपलब्ध राहतील, अशी व्यवस्था निर्माण केली. त्यामुळे ज्या ग्राहकांना डाटाची गरज नाही, त्यांनाही डाटा पॅक घेणे बंधनकारक बनले. या पार्श्वभूमीवर ट्रायने केवळ व्हॉइस कॉल आणि एसएमएस यांचे पॅक जारी करण्याचे आदेश दूरसंचार कंपन्यांना दिले आहेत. त्यानुसार, आता प्रत्येक दूरसंचार कंपनीस किमान एक टेरिफ व्हाउचर केवळ व्हॉइस कॉल आणि एसएमएस सेवा देण्यासाठी ठेवावे लागेल, त्याची वैधता ३६५ दिवसांपेक्षा जास्त असणार नाही.

कुपन कितीचे हवे? 

ट्रायने दूरसंचार कंपन्यांना कोणत्याही किमतीचे रिचार्ज व्हाउचर जारी करण्याची अनुमती दिली आहे. मात्र, कमीतकमी १० रुपये किमतीचे एक रिचार्ज कुपन जारी करणे कंपन्यांना बंधनकारक असेल. आधी कंपन्यांना १० रुपये व १०च्या पटीतील रिचार्ज व्हाउचर जारी करण्याची परवानगी होती. 

टॅग्स :केंद्र सरकारमोबाइल