Join us

ट्रम्प यांचा भारताचा समावेश असलेल्या BRICS ला अल्टीमेटम; अमेरिकन बाजारपेठ बंद करण्याचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2024 14:12 IST

donald trump : काही दिवसांपूर्वी बिक्स संघटनेतील देशांनी डॉलरला पर्यायी चलन काढण्याचा विचार मांडला होता. यावर आता डोनाल्ड ट्रम्प यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे.

donald trump :डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षपदावर येण्याआधीच आपले रंग दाखवायला सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वी भारताचा सहभाग असलेल्या ब्रिक्स देशांनी एक नवीन चलन वापरण्याची योजना आखली आहे. यावरुन अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं पित्त खवळलं आहे. त्यांनी  ब्रिक्स देशांवर जोरदार हल्ला चढवला आहे. ब्रिक्स देशांनी अमेरिकन डॉलरला बायपास करून नवीन ब्रिक्स चलन तयार करण्याचा प्रयत्न करू नये, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे. असे झाल्यास त्यांना गंभीर आर्थिक निर्बंधांना सामोरे जावे लागेल. एवढेच नाही तर तुम्हाला १००% टॅरिफचाही सामना करावा लागेल, असा दम भरला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांची X वर पोस्ट“ब्रिक्स देश अमेरिकन डॉलरला पर्याय म्हणून नवीन चलन आणतील आणि आम्ही शांतपणे पाहत राहू, असं समजू नका. ब्रिक्स देश कोणतंही नवीन चलन आणणार नाही किंवा अमेरिकन डॉलरला पर्याय वापरणार नाही, असे वचन आम्हाला हवे आहे. जर ब्रिक्सने असं केलं नाही तर १००% शुल्काचा सामना करावा लागेल. शिवाय अमेरिकन बाजारपेठेत त्यांचा माल विकण्याचे स्वप्न सोडून द्यावं लागेल.

ब्रिक्स देशांचा थेट समाचार घेताना ट्रम्प म्हणाले, "त्यांना आणखी काही 'मूर्ख' सापडतील! ब्रिक्सला आंतरराष्ट्रीय व्यापारात अमेरिकन डॉलरची जागा घेण्याची कोणतीही संधी मिळणार नाही. जर कोणत्याही देशाने तसा प्रयत्न केला, तर त्यांना अमेरिकेला बायबाय करावं लागेल."

अमेरिकन वर्चस्व कायम ठेवण्याचा प्रयत्नडोनाल्ड ट्रम्प यांच्या या वक्तव्यामुळे अमेरिका आपल्या चलनाबाबत कोणतीही तडजोड करणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ब्रिक्स देशांनी डॉलरच्या तुलनेत उचललेली पावले अमेरिकेच्या आर्थिक सुरक्षेला धोका असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. ट्रम्प यांच्या या विधानाने जागतिक व्यापार आणि चलनांच्या राजकारणात मोठा संदेश गेला आहे. यावर ब्रिक्स देश काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे बाकी आहे.

ब्रिक्स देशांची योजना काय आहे?डॉलरवरील त्यांचे अवलंबित्व कमी करण्यासाठी ब्रिक्स देश दीर्घ काळापासून पर्यायी चलनांच्या दिशेने काम करत आहेत. जर हे देश यशस्वी झाले तर त्याचा जागतिक व्यापार आणि आर्थिक समतोल यावर मोठा परिणाम होऊ शकतो. 

टॅग्स :डोनाल्ड ट्रम्पअमेरिकाअमेरिकाव्यवसाय