Trump Tariff: डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी शुल्काबाबत आणखी एक यू-टर्न घेतला आहे. देशांतर्गत कार उत्पादकांना दिलासा देत ट्रम्प प्रशासनानं ऑटोमोबाइल क्षेत्रावरील आयात शुल्काचा (टॅरिफ) परिणाम कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत विदेशी पार्ट्सवरील शुल्क कमी केलं जाणार असून आयात केलेल्या कारवर एकाच वेळी अनेक प्रकारची शुल्क आकारली जाणार नाहीत. वाणिज्य मंत्री हॉवर्ड लॅटनिक यांनी हे पाऊल अमेरिकन उद्योग आणि कामगारांसाठी मोठा विजयाचं असल्याचं म्हटलं.
यापूर्वी काय होती योजना?
ट्रम्प यांनी यापूर्वी ३ मेपर्यंत ऑटो पार्ट्सवर २५ टक्के शुल्क लावण्याची योजना आखली होती, परंतु उद्योगांच्या विरोधानंतर आता नवीन नियम शिथिल करण्यात आले आहेत. मात्र, अमेरिकन नोकऱ्यांचं रक्षण करण्यासाठी आणि परदेशी कंपन्यांवर दबाव आणण्यासाठी हे पाऊल उचलणं आवश्यक असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलंय.
सोन्याची किंमत पाहून फुटतोय घाम? 'हा' आहे २४ कॅरेट सोनं स्वस्तात खरेदी करायचा जुगाड
काय आहे नवा प्लॅन?
रॉयटर्सनं दिलेल्या माहितीनुसार, नव्या योजनेअंतर्गत देशांतर्गत कार निर्मितीत वापरल्या जाणाऱ्या विदेशी भागांवरील शुल्क कमी केलं जाणार आहे. आयात केलेल्या गाड्यांवर एकापेक्षा जास्त दर आकारले जाणार नाहीत, जेणेकरून त्यांच्या किंमती वाढणार नाहीत. लॅटनिक यांच्या मते, या धोरणामुळे अमेरिकेत गुंतवणूक आणि उत्पादन वाढवणाऱ्या कंपन्यांना फायदा होईल.
वॉल स्ट्रीट जर्नलनं ही बातमी सर्वप्रथम दिली होती. डेट्रॉईटमधील सर्वात मोठ्या ऑटो कंपन्या आणि १,००० हून अधिक पुरवठादार असलेल्या मिशिगनच्या भेटीपूर्वी ट्रम्प यांच्या भेटीपूर्वी हा दिलासा अपेक्षित होता.
कंपन्यांनी आवाज का उठवला?
गेल्या आठवड्यात जीएम, टोयोटा, फोक्सवॅगन, ह्युंदाईसह अनेक कंपन्यांच्या संघटनांनी ट्रम्प यांना इशारा पत्र पाठवलं होतं. २५ टक्क्यांच्या दरामुळे कारच्या किमती वाढतील आणि विक्री कमी होईल, असं ते म्हणाले होते. जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत होईल, ज्यामुळे उत्पादन थांबेल आणि लहान पुरवठादार दिवाळखोर होऊ शकतात, ज्यामुळे बेरोजगारी वाढेल, असंही त्यांचं म्हणणं होतं. अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी, अर्थमंत्री आणि वाणिज्य सचिव यांना हे पत्र पाठवण्यात आलं होतं. हे दर लागू करण्यापूर्वी उद्योगाला वेळ हवा होता, असा आग्रह कंपन्यांनी धरला.
त्याचा काय परिणाम होईल?
दर कपातीमुळे कार उत्पादकांच्या उत्पादन खर्चात घट होईल, असं तज्ज्ञांचं मत आहे. यामुळे ग्राहकांना कारच्या किमती स्थिर राहण्यास मदत होईल. मात्र, यामुळे चीनवरील अवलंबित्व कमी करण्याच्या अमेरिकी सरकारच्या उद्दिष्टावर परिणाम होऊ शकतो, अशी भीती काहींनी व्यक्त केली आहे.