Join us

भारताकडून शून्य टॅरिफ ऑफर; ट्रम्प यांचे पुन्हा विधान; म्हणे, कोणतीही वस्तू विकणे अतिशय अवघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 06:23 IST

डोनाल्ड ट्रम्प टॅरिफबाबत भारताविरोधात सतत एकतर्फी वक्तव्ये करत असून, पुन्हा एकदा भारताने अमेरिकन वस्तूंवरील आयात शुल्क हटविण्याची तयारी दर्शविली असल्याचा दावा केला आहे.

दोहा: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प टॅरिफबाबत भारताविरोधात सतत एकतर्फी वक्तव्ये करत असून, त्यांनी गुरुवारी पुन्हा एकदा भारताने अमेरिकन वस्तूंवरील आयात शुल्क (टॅरिफ) हटविण्याची तयारी दर्शविली असल्याचा दावा केला आहे. जर असे झाले असेल तर भारतातील स्थानिक उद्योगांवर प्रचंड दबाव येण्याची भीती असून, अनेक उद्योग बंद पडण्याची शक्यता आहे.

ट्रम्प म्हणाले की, भारतात कोणतीही वस्तू विकणे अतिशय अवघड आहे. ते आम्हाला एक करार ऑफर करत आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला त्यांनी दावा केला होता की, भारताने अमेरिकेवरील टॅरिफ शून्य करण्यास सहमती दर्शविली आहे. दरम्यान, भारत-अमेरिका व्यापार करारावरील चर्चा चांगली प्रगती करत आहे, असे भारताच्या वाणिज्य सचिवांनी म्हटले आहे. 

रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी कतारची राजधानी दोहा येथे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि कतारचे अमीर शेख तमीम बिन हमद अल थानी यांची भेट घेतली.

पीयूष गोयल वाटाघाटीसाठी जाणार अमेरिकेला

यापूर्वी ट्रम्प यांनी भारताला टॅरिफ किंग, मोठा गैरवर्तन करणारा देश म्हटले होते. अमेरिकेसोबत द्विपक्षीय व्यापार करार करण्यासाठी होत असलेल्या चर्चेसाठी भारताकडून भारताचे व्यापार आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांच्या नेतृत्वात एक शिष्ठमंडळ १७ मे रोजी वॉशिंग्टनमध्ये चर्चा करणार आहे. दोन्ही देश या कराराला सप्टेंबर ते ऑक्टोबरपर्यंत अंतिम रूप देण्याच्या प्रयत्नात आहेत, असे सरकारी सूत्रांनी माहिती देताना सांगितले.

अमेरिकेच्या वस्तू स्वस्त किमतीत भारतात येणार?

रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, केंद्र सरकारने कराराच्या पहिल्या टप्प्यात ६० टक्के टॅरिफ असलेल्या वस्तूंवर शून्य टक्के कराचा प्रस्ताव अमेरिकेला दिला असून, यावर चर्चा सुरू असल्याचे अहवालात म्हटले आहे. याचा अर्थ असा की अमेरिका भारतात आपल्या अनेक वस्तू स्वस्त किमतीत विकू शकेल.

भारताची भूमिका काय?

ट्रम्प यांच्या वक्तव्यावर भारताकडून परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांची प्रतिक्रिया आली आहे. ते म्हणाले की, टॅरिफ शून्य करण्यावर अद्याप काहीही ठरलेले नाही. भारत टॅरिफमध्ये सवलत देईल. मात्र, दोन्ही देशांकडून सवलत मिळावी अशी अपेक्षा आहे. (वृत्तसंस्था)

 

टॅग्स :डोनाल्ड ट्रम्पमुकेश अंबानी