donald trump : दुसऱ्यासाठी खड्डा खणला आणि स्वतः त्यात पडला, अशी म्हण मराठीत प्रसिद्ध आहे. अनेकदा लोक दुसऱ्याची जिरवण्याच्या नादात स्वतःचं नुकसान करुन घेतात. सध्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची अवस्था अशीच झाली आहे. मात्र, ट्रम्प यांच्या या निर्णयाचं फटका तेथील सर्वसामान्य अमेरिकन नागरिकांना सहन करावा लागत आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जेव्हापासून सत्ता हाती घेतली, तेव्हापासून त्यांनी टॅरिफ हा शब्द महत्त्वाचा मुद्दा केला आहे. दरवाढीवरुन सातत्याने ते इतर देशांना इशारा देत आहेत. त्याच्या दरवाढीच्या धमक्यांमुळे जगभरात व्यापार युद्धाची परिस्थिती निर्माण झाली आहे. वास्तविक, त्यांना इतिहासाचा विसर पडल्याचे दिसत आहे.
परदेशी वस्तूंवर उच्च आयात शुल्क लादून स्वदेशीला चालना मिळेल अशी ट्रम्प यांची धारणा आहे. पण, १९३० साली अमेरिकन काँग्रेसनेही अशीच चूक केली होती. त्याचा परिणाम असा झाला की संपूर्ण जगात प्रचंड मंदी आली. याचा सर्वाधिक फटका अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला बसला.
९५ वर्षांपूर्वी अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष हर्बर्ट हूवर यांनी परदेशी वस्तूंवर उच्च शुल्क लादले होते. यासाठी त्यांनी हॉले-स्मूट टॅरिफ कायदा १९३० पास केला. या कायद्याचा उद्देश परदेशी वस्तूंवर शुल्क वाढवून अमेरिकन उद्योगांना आणि शेतकऱ्यांना संरक्षण देणे हा होता. या कायद्यानुसार, त्यावेळी २०,००० हून अधिक आयात केलेल्या वस्तूंवर शुल्क लादण्यात आले होते.
जागतिक मंदीचे कारणमात्र, या कायद्याचा विपरीत परिणाम झाला. वाढलेल्या टॅरिफमुळे, इतर देशांनी देखील अमेरिकन निर्यातीवर शुल्क लादले. विशेषत: युरोप आणि इतर प्रदेशातील देशांनी अमेरिकन उत्पादनांवर उच्च शुल्क लादले. यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारात मोठी घट झाली. त्याचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर झाला. अमेरिकन उत्पादनांवरील प्रचंड शुल्कामुळे, परदेशात अमेरिकन उत्पादनांची मागणी जवळजवळ संपुष्टात आली. निर्यातीत घट झाल्याने अमेरिकन कंपन्यांचे प्रचंड नुकसान झाले. या सर्वाची कडी म्हणजे जागतिक मंदी निर्माण झाली.
ट्रम्प यांच्या निर्णयाला अर्थतज्ज्ञांचाही विरोधडोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाचा अर्थतज्ज्ञांनीही विरोध केला आहे. काही अर्थतज्ञांच्या मते हा निर्णय म्हणजे पायावर कुऱ्हाड मारण्यासारखे आहे. ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारतावरही परिणाम झाला आहे.