Join us
Daily Top 2Weekly Top 5

ट्रम्प यांचे सारे काही तेलासाठीच?; व्हेनेझुएलाचे कोट्यवधी बॅरल तेल थेट अमेरिकेकडे, २०२७ पर्यंत…

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 07:21 IST

विक्रीतून येणाऱ्या कोट्यवधी डॉलर्सवर ट्रम्प यांचे नियंत्रण; २०२७ पर्यंत कच्च्या तेलाचे दर कोसळणार?; ‘गोल्डमन सॅक्स’चा अंदाज

वॉशिंग्टन : व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मदुरो यांना अमेरिकन लष्कराने अटक केल्यानंतर आता अमेरिकेने या देशाच्या तेलसाठ्यावर आपले वर्चस्व निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. व्हेनेझुएलाचे प्रशासन अमेरिकेला ३ ते ५ कोटी बॅरल उच्च दर्जाचे तेल देणार असल्याची घोषणा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. 

या विक्रीतून येणारा कोट्यवधी डॉलर्सचा निधी थेट ट्रम्प यांच्या नियंत्रणाखाली असेल.  हे तेल बाजारभावाने विकले जाईल व त्यातील पैशांवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून माझे नियंत्रण असेल. हा निधी व्हेनेझुएला आणि अमेरिकेतील जनतेच्या हितासाठी वापरला जाईल, मोठ्या जहाजांद्वारे हे तेल थेट अमेरिकन बंदरांवर उतरवले जाणार आहे, असे ट्रम्प म्हणाले.

तेलाची किंमत किती?

सध्या कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल ५६ डॉलर्सच्या आसपास आहेत. या हिशोबाने ५ कोटी बॅरल तेलाची किंमत २.८ अब्ज डॉलर्स (सुमारे २३,००० कोटी रुपये) इतकी होते. 

अमेरिका दररोज साधारण २ कोटी बॅरल तेलाचा वापर करते. त्यामानाने व्हेनेझुएलातून येणारा हा साठा अमेरिकेची अडीच दिवसांची गरज भागवण्यास पुरेसा आहे.

तेल कंपन्यांच्या प्रमुखांची तातडीची बैठक : या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी शुक्रवारी ‘ओव्हल ऑफिस’मध्ये अमेरिकेतील बड्या तेल कंपन्यांच्या प्रमुखांची बैठक बोलावली आहे. यामध्ये दिग्गज कंपन्यांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. 

दरात मोठी घसरण होणार? 

व्हेनेझुएलातील तेल उत्पादन वाढल्यास कच्च्या तेलाच्या किमतीवर मोठा दबाव येत दरांमध्ये मोठी घसरण होऊ शकते, असा अंदाज ‘गोल्डमन सॅक्स’ने व्यक्त केला आहे.

२०२७ नंतर तेलाचे दर मोठ्या प्रमाणात घसरण्याची भीती आहे. याला रशिया आणि अमेरिकेचे वाढते उत्पादन आणि आता व्हेनेझुएलाची भर पडली आहे.

२ दशकांनंतर पुन्हा सुवर्णकाळ येणार?

एकेकाळी तेल उत्पादनात जगात अव्वल असलेल्या व्हेनेझुएलाचे उत्पादन गेल्या २० वर्षांत कमालीचे घटले आहे. मात्र, अमेरिकेच्या हस्तक्षेपानंतर आता चित्र बदलण्याची चिन्हे आहेत. व्हेनेझुएलातील सुधारणा टप्प्याटप्प्याने होतील. तेथील पायाभूत सुविधांची दुरवस्था झाली आहे. तिथे मोठ्या गुंतवणुकीची गरज आहे, असे गोल्डमन सॅक्सने म्हटले आहे.

- ३० लाख बॅरल तेल उत्पादन दररोज व्हेनेझुएला २००५ च्या सुमारास करत असे. 

- ९.३ लाख बॅरलवर सध्या व्हेनेझुएलाचे तेल उत्पादन आले आहे.

- ६१ डॉलर्सच्या आसपास सध्या ब्रेंट क्रूडचा दर. 

English
हिंदी सारांश
Web Title : Trump's Venezuela Oil Grab: Billions of Barrels Headed to US

Web Summary : Following Maduro's arrest, the US eyes Venezuela's oil, with Trump controlling billions in revenue. Venezuela will supply millions of barrels. This move could significantly impact global oil prices, potentially causing a price drop, experts predict. The US intervention aims to revive Venezuela's oil production.
टॅग्स :अमेरिकाडोनाल्ड ट्रम्पखनिज तेल