Join us

ट्रम्प यांच्या २५ टक्के टॅरिफचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होणार? RBI गव्हर्नर म्हणाले,'परिस्थिती बदलत राहील'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 15:54 IST

एमपीसी निर्णयांची घोषणा करताना आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणावर भाष्य केलं.

RBI Governor on  Trump tariffs Impact on India:भारतीय रिझर्व्ह बँकेने बुधवारी रेपो दर ५.५ टक्के कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. यासोबतच, आरबीआयने आर्थिक धोरणाची भूमिका देखील तटस्थ ठेवलीय. तसेच, बाँड डिपॉझिट रेट ५.२५ टक्के, एमएसएफ आणि बँक दर ५.७५ टक्के ठेवला आहे. रेपो दर स्थिर राहिल्याने, गृह, कार आणि इतर किरकोळ कर्जांवरील व्याजदरात बदल होण्याची शक्यता नाही. एमपीसी निर्णयांची घोषणा करताना आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी टॅरिफ अनिश्चितता अजूनही उदयास येत असल्याचे म्हटलं.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी भारताला "मृत अर्थव्यवस्था" असं म्हणत टोमणा मारला होता आणि भारतीय वस्तूंवर २५ टक्के टॅरिफ म्हणजेच आयात कर लादण्याची घोषणा केली होती. यासोबतच, त्यांनी रशियाकडून लष्करी उपकरणे आणि कच्चे तेल खरेदी केल्याबद्दल भारतावर अतिरिक्त दंड लादण्याचाही इशारा दिला होता. जर ट्रम्प यांचे हे निर्णय लागू झाले तर त्याचा भारतीय व्यापारावर मोठा परिणाम होईल. आरबीआयने २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी जीडीपी वाढीचा अंदाज ६.५ टक्के ठेवला आहे. त्याच वेळी, चालू आर्थिक वर्षासाठी किरकोळ महागाईचा अंदाज ३.१ टक्के करण्यात आला आहे, तर पूर्वी तो ३.७ टक्के असण्याचा अंदाज होता.

"ट्रम्प सरकारने भारतातून येणाऱ्या वस्तूंवर २५ टक्के आयात कर लावण्याची घोषणा केली आहे. या निर्णयाचा भारताच्या निर्यात वाढीवर आणि आर्थिक परिस्थितीवर परिणाम होऊ शकतो. प्रत्यक्ष परिणाम किती होईल हे सांगणे कठीण आहे. वाढती अनिश्चितता, जागतिक व्यापार तणाव आणि वित्तीय बाजारातील अस्थिरता यांचा भारताच्या विकासावर परिणाम होऊ शकतो. टॅरिफशी संदर्भात अनिश्चितता आहेत, परिस्थिती बदलत राहील.आम्ही प्रत्येक नवीन डेटावर लक्ष ठेवू आणि आवश्यक असल्यास धोरण बदलू," असं आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी म्हटलं.

दरम्यान, ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाचा निर्यात, चलन विनिमय आणि विकास दरावर निश्चितच परिणाम होऊ शकतो. पण आरबीआयचे तटस्थ आणि सावध धोरण, मजबूत देशांतर्गत मागणी आणि विश्वासार्ह चलनविषयक वातावरण आपल्याला विकासाच्या मार्गावर ठेवू शकते. ज्यामध्ये केवळ वेळेवर धोरण समायोजन फायदेशीर ठरू शकते.

"सामान्यपेक्षा चांगला नैऋत्य मान्सून, कमी चलनवाढ आणि अनुकूल आर्थिक परिस्थिती यामुळे देशांतर्गत आर्थिक घडामोडींना चालना मिळत आहे. मजबूत सरकारी भांडवली खर्चासह सहाय्यक चलनविषयक, नियामक आणि राजकोषीय धोरणांमुळे मागणी वाढण्याची अपेक्षा आहे. येत्या काही महिन्यांत बांधकाम आणि व्यापारातील सातत्यपूर्ण वाढीमुळे सेवा क्षेत्र देखील उत्साही राहण्याची अपेक्षा आहे," असेही संजय मल्होत्रा म्हणाले. 

टॅग्स :डोनाल्ड ट्रम्पआरबीआय रेपो रेटभारतीय रिझर्व्ह बँक