Join us
Daily Top 2Weekly Top 5

देशांतर्गत भ्रमंतीला मिळत आहे प्रतिसाद; आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या संख्येत घट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2021 07:36 IST

Domestic travel : देशांतर्गत विमान प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत वाढ दिसून येत आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय प्रवाशांची संख्येत लक्षणीय परिणाम दिसून येत आहे.

नवी दिल्ली : काेराेना महामारीचा भारतात शिरकाव हाेऊन सुमारे पावणे दाेन वर्षे झाली आहेत. या कालावधीत महामारीच्या दाेन लाटांचे परिणाम देशातील विविध क्षेत्रांवर दिसून आले आहेत. पहिल्या दाेन लाटांमध्ये प्रवासी विमान वाहतुकीला माेठा फटका बसला हाेता. मात्र, ओमायक्राॅनचे रुग्ण वाढत असताना काहीसे वेगळे चित्र आहे. देशांतर्गत विमान प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत वाढ दिसून येत आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय प्रवाशांची संख्येत लक्षणीय परिणाम दिसून येत आहे.

काेराेनाच्या यापूर्वीच्या लाटा आणि सध्या ओमायक्राॅनमुळे निर्माण झालेल्या परिस्थित विमान प्रवासावर वेगवेगळा परिणाम दिसून येत आहे. विविध विमान कंपन्या आणि ट्रॅव्हल कंपन्यांच्या सूत्रांनी याबाबत माहिती दिली. त्यानुसार, आंतरराष्ट्रीय विमान प्रवाशांच्या संख्येत घट झाली आहे. मात्र, देशांतर्गत विमान प्रवाशांच्या संख्येत वाढ दिसून येत आहे. सणासुदीचा हंगाम, लग्नसराई आणि सुट्यांच्या दिवसांमध्ये अजूनही मागणी कायम आहे. आंतरराष्ट्रीय विमान प्रवासावर केवळ भारतच नव्हे तर अनेक देशांनी अनेक निर्बंध लादले आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या संख्येत २० टक्के घट दिसून आली आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, प्रवाशांकडून प्रवासाचे बेत रद्द करण्यात येत नसून पुढे ढकलण्यात येत आहेत. 

पर्यटनस्थळांना मागणीमेट्राे शहरांसह गाेवा, चंदीगड, जयपूर यासारख्या पर्यटनस्थळांना प्रचंड मागणी दिसून येत आहे. सध्याचे बुकिंग पॅटर्न आणि ऑनलाईन सर्च पाहता या स्थितीत त्यात आणखी वाढ अपेक्षित असल्याचे ट्रॅव्हल कंपन्यांचे म्हणणे आहे.  ओमायक्राॅनचे सावट असूनही ५८ टक्के भारतीयांची पुढीन तीन महिन्यांमध्ये भ्रमंतीची याेजना आहे. तर १८ टक्के जणांनी रेल्वे, विमान किंवा रस्ते मार्गाने प्रवासासाठी बुकिंग केले आहे. ही संख्या वाढण्याचा अंदाज आहे.

पूर्वानुभवामुळे भीतीयापूर्वीच्या लाटेदरम्यान आलेल्या अनुभवामुळे अनेक जण आंतरराष्ट्रीय प्रवास करण्याबाबत साशंक आहेत. अनेकजण भारतात आले. मात्र, दुसऱ्या लाटेमुळे भारतातच अडकले. नाेकरी असलेल्या देशांमध्ये निर्बंध लागले आणि त्यांना परत जाता आले नाही. त्यामुळे ख्रिसमस आणि नववर्षाच्या कालावधीतही आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या संख्येत वाढ झालेली नाही.

टॅग्स :विमानतळओमायक्रॉन