Join us  

मिस्रींवर नवे आरोप ठेवू इच्छित नाही -टाटा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2020 3:20 AM

टाटा समूहासाठी माझ्या कार्यकाळामध्ये मी काय केले, याचा विचार या खटल्यामध्ये होणार असेल तर त्याचा निर्णय हा इतरांनी करावा, असे टाटा यांनी या शपथपत्रामध्ये नमूद केले आहे.

नवी दिल्ली : टाटा उद्योगसमूहाच्या पूर्वीच्या नोंदींवरून आपण टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्री यांच्यावर कोणतेही नवीन आरोप करू इच्छित नसल्याचे टाटा सन्सचे सेवानिवृत्त अध्यक्ष रतन टाटा यांनी स्पष्ट केले आहे. सर्वाेच्च न्यायालयामध्ये दाखल केलेल्या एका शपथपत्रामध्ये टाटा यांनी हे स्पष्ट केले आहे. टाटा ग्रुपचे सर्व रेकॉर्ड हे पाहण्यासाठी उपलब्ध असून, त्यावरून कोणीही निष्कर्ष काढू शकेल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

टाटा समूहासाठी माझ्या कार्यकाळामध्ये मी काय केले, याचा विचार या खटल्यामध्ये होणार असेल तर त्याचा निर्णय हा इतरांनी करावा, असे टाटा यांनी या शपथपत्रामध्ये नमूद केले आहे. आयुष्याच्या या टप्प्यावर माझ्या कारकिर्दीबाबत कोणाकडून शिफारस घेण्याची गरज वाटत नसल्याचे स्पष्ट करून टाटा यांनी आपण या वादापासून अलिप्त राहू इच्छित असल्याचे विनयपूर्वक नमूद केले आहे. टाटा ट्रस्टचे विद्यमान चेअरमन असलेल्या रतन टाटा यांनी या शपथपत्रामध्ये टाटा सन्सच्या चेअरमनपदावर सायरस मिस्री यांची झालेली नियुक्ती ही टाटा समूहाचे नेतृत्व करण्यासाठी होती, असे स्पष्ट केले आहे. आपल्या पूर्वसुरींनी घेतलेल्या निर्णयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून सायरस मिस्री हे केवळ टीकाकाराची भूमिका निभावत असल्याचे टाटा यांनी म्हटले आहे. टाटाचे नेतृत्व हे भूतकाळातील चुका शोधणारे नसून त्यापासून भविष्यामध्ये काय करता येईल, हे बघणारे असल्याचा मिस्रींना विसर पडला असल्याचे या प्रतिज्ञापत्रामध्ये म्हटले आहे. टाटा सन्सच्या चेअरमन पदावरून सायरस मिस्री यांची आॅक्टोबर २०१६मध्ये हकालपट्टी केल्यानंतर टाटा ट्रस्ट आणि शापूरजी पालनजी ग्रुप यांच्यामध्ये प्रदीर्घ न्यायालयीन लढाई सुरू आहे. या प्रकरणामध्ये आपली बाजू स्पष्ट करणारे प्रतिज्ञापत्र रतन टाटा यांनी ३ आॅगस्ट रोजी सर्वाेच्च न्यायालयात दाखल केले असून त्यामध्ये वरील प्रपिादन केले आहे. 

टॅग्स :रतन टाटाटाटाव्यवसाय