मुंबई - बांधकाम क्षेत्रातील नावाजलेली कंपनी लोढा समुह यांच्यात व्यावसायिक वाद समोर आला आहे. अभिनंदन लोढा यांनी लोढा ब्रँडचा लोगो वापरू नये अशी मागणी करत मोठा भाऊ अभिषेक लोढा यांनी हायकोर्टात धाव घेतली आहे. अभिषेक लोढा यांच्या मालकीच्या मॅक्रोटेक डेव्हलपर्स कंपनीने धाकटा भाऊ अभिनंदन लोढाच्या हाऊस ऑफ अभिनंदन लोढा या कंपनीविरोधात याचिका केली आहे. लोढा ब्रँडचा लोगो आणि स्वामित्त हक्क मॅक्रोटेक डेव्हलपर्सकडे असल्याचा दावा अभिषेक लोढा यांनी याचिकेत केला आहे.
याचिकेत काय केलाय दावा?
मॅक्रोटेक डेव्हलपर्सने केलेल्या याचिकेत ती लोढा समुहाची प्रमुख कंपनी असल्याचं म्हटलं आहे. लोढा समुहातील इतर कंपन्या त्यांच्या व्यापारचिन्हाचा वापर करू शकतील हा करार २०१५ पर्यंत होता. २०१५ नंतर अभिनंदन लोढा हे समुहापासून वेगळे होऊन स्वत:चा व्यवसाय सुरू करतील असा निर्णय घेण्यात आला. कौटुंबिक चर्चेनुसार मार्च २०१७ आणि त्यानंतर २०२३ मध्ये वेगळे होण्याच्या अटीवर अभिनंदन यांनी हाऊस ऑफ अभिनंदन लोढा नावाने काम करतील असा निर्णय झाला. मात्र २०२३ च्या कौटुंबिक करारात आपण सहभागी नव्हतो त्यामुळे त्या अटींना बांधील नसल्याचा दावा अभिषेक लोढा यांच्या मॅक्रोटेक डेव्हलपर्स कंपनीने केला. अभिषेक लोढा यांनी लहान भाऊ अभिनंदन लोढा यांच्याकडून ५ हजार कोटी नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
मंगळवारी मॅक्रोटेक डेव्हलपर्सने जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय की, २००८ ते २०१४ या काळात कंपनी कर्जात बुडाली होती ज्यामुळे कुटुंबात तणाव निर्माण झाला होता. त्यावेळी कुटुंबातील प्रत्येक सदस्य संपत्ती आणि कर्ज या दोन्हीचा एक हिस्सा घेईल यावर सहमती बनली. परंतु तेव्हा अभिनंदनने इतके जास्त ग्राहक, कर्ज आणि बांधकाम व्यवसाय करण्यास नकार दिला. तेव्हा केवळ रक्कम घेण्यावर प्राधान्य दाखवले. त्यामुळे अभिषेक आणि त्याच्या आई वडिलांवर २० हजार कोटी कर्ज होते तर अभिनंदनला १ हजार कोटी भरपाई देत नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी वेगळे करण्यात आले. आता मॅक्रोटेक डेव्हलपर्स कंपनी शेअर बाजारात चांगली कामगिरी करत असून कंपनीच्या शेअर्स दरातही वाढ झाली आहे. IPO नंतर जेव्हा ही कंपनी मजबूत व्हायला लागली तेव्हा अभिनंदन लोढाने रिअल इस्टेट व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला त्याने लोढा ब्रँडचा वापर करण्याचा प्रयत्न केला परंतु अभिषेक लोढा यांनी मज्जाव केला. तरीही अभिनंदन लोढा यांनी हाऊस ऑफ अभिनंदन लोढा रिब्रॅन्डिंग करून लोढा ट्रेडमार्क वापरण्यास सुरू ठेवले त्यामुळे हे कायदेशीर पाऊल अभिषेकने उचलले आहे.
दरम्यान, मॅक्रोटेक कंपनीने अभिनंदनला १ हजार कोटी दिल्याचा दावा अभिनंदन लोढा यांनी फेटाळला. अभिनंदन यांच्याकडून कोर्टात दाखल केलेल्या कागदपत्रात २०१७ चा कौटुंबिक करारही जोडला आहे. कौटुंबिक करारानुसार अभिनंदन लोढा यांना काही अपार्टंमेंटसह ४२९ कोटी म्हणजे ५०० कोटी रुपये मिळाले होते असं अभिनंदन यांच्या कंपनीने म्हटलं आहे. लोढा कुटुंबाचे प्रमुख मंगलप्रभात लोढा हे महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री आहेत. मॅक्रोटेक डेव्हलपर्समध्ये प्रवर्तकांचा हिस्सा ७२ टक्के इतका आहे ज्याची किंमत ८२ हजार ३१२ कोटी इतकी आहे. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी २७ जानेवारीला होणार आहे.