Join us  

डिस्ने+ हॉटस्टार लवकरच होऊ शकेल जिओ+ हॉटस्टार; अंबानी- 'स्टार इंडिया'चा व्यवहार होणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2023 9:35 PM

गेल्या आठवड्यात एका करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे पण...

Mukesh Ambani Reliance - Jio hotstar:  मुकेश अंबानी यांनी काही वर्षांपूर्वी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये मोठी घोषणा केली होती. ते म्हणाले की लवकरच तो दिवस येईल जेव्हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल आणि त्याच दिवशी OTT वर देखील प्रदर्शित होईल. आता ते जे बोलले ते खरे ठरेल असे वाटू लागले आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज अनेक दिवसांपासून डिस्नेकडून स्टार इंडियाचा व्यवसाय विकत घेण्याचा प्रयत्न करत आहे. आता त्यात एक मोठे अपडेट आले आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीज आणि वॉल्ट डिस्ने कंपनीने गेल्या आठवड्यात लंडनमध्ये नॉन-बाइंडिंग करारावर स्वाक्षरी केली आहे. याचा अर्थ रिलायन्स इंडस्ट्रीज आणि डिस्नेचे अधिकारी आता एकत्र बसून डिस्नेचा स्टार इंडिया व्यवसाय ताब्यात घेण्यासाठी अंतिम फेरीत चर्चा करतील आणि डिस्नेच्या स्टार इंडिया व्यवसायाचे मूल्यांकन निश्चित केले जाईल. अंतिम करार न झाल्यास, दोन्ही पक्ष माघार घेऊ शकतात.

मुकेश अंबानींनी या डील आधी ट्विटर डीलमधून धडा घ्यावा असे बोलले जात आहे. जेव्हा इलॉन मस्कने ट्विटर विकत घेण्याचा करार केला तेव्हा त्याने एक बंधनकारक करार केला. अशा परिस्थितीत जेव्हा इलॉन मस्क नंतर डील मधून मागे हटले, तेव्हा ट्विटरने त्यांच्या विरोधात कोर्टात धाव घेतली. अशा परिस्थितीत इलॉन मस्क यांना ट्विटर विकत घेण्यासाठी करार पूर्ण करावाच लागला.

दरम्यान, Disney+Hotstar होईल Jio+Hotstar

जर मुकेश अंबानी आणि डिस्ने यांच्यातील बोलणी पक्क्या करारावर पोहोचली तर डिस्ने+ हॉटस्टार फेब्रुवारीपर्यंत जिओ+ हॉटस्टार बनण्याची शक्यता आहे. ईटीच्या बातम्यांनुसार, रिलायन्स इंडस्ट्रीज नवीन कंपनीमध्ये ५१% हिस्सा ठेवू शकते, तर स्टार इंडिया ४९% हिस्सा राखू शकते. अशा परिस्थितीत भारतात ते टेलिव्हिजन आणि OTT व्यवसायातून बाहेर पडू शकतात. मात्र, दोन्ही कंपन्यांनी याबाबत कोणतेही अधिकृत विधान दिलेले नाही.

टॅग्स :मुकेश अंबानीजिओस्टार प्लसरिलायन्स