Join us

आयडीबीआयमध्ये एलआयसीची हिस्सेदारी वाढविण्यावर चर्चा; विक्रीसाठी दोन हजार शाखा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2018 23:10 IST

भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (एलआयसी) बोर्डाची महत्त्वाची बैठक मंगळवारी होत असून, कर्जाच्या ओझ्याखाली दबून गेलेल्या आयडीबीआय बँकेतील एलआयसीची हिस्सेदारी वाढवून ५१ टक्के करण्याचे स्वरूप बैठकीत ठरविले जाणार आहे. ही हिस्सेदारी खरेदीनंतर एलआयसीचे बँकिंग क्षेत्रात पदार्पण होणार आहे.

नवी दिल्ली : भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (एलआयसी) बोर्डाची महत्त्वाची बैठक मंगळवारी होत असून, कर्जाच्या ओझ्याखाली दबून गेलेल्या आयडीबीआय बँकेतील एलआयसीची हिस्सेदारी वाढवून ५१ टक्के करण्याचे स्वरूप बैठकीत ठरविले जाणार आहे. ही हिस्सेदारी खरेदीनंतर एलआयसीचे बँकिंग क्षेत्रात पदार्पण होणार आहे.सूत्रांनी सांगितले की, खुला प्रस्ताव, बोर्ड पातळीवरच्या नियुक्त्या आणि आयडीबीआय बँकेच्या पुनरुज्जीवनासाठीची भविष्यातील व्यूहरचना यावर बैठकीत चर्चा होईल. अधिग्रहण प्रक्रिया पार पाडण्यासाठी मर्चंट बँकर व कायदेशीर सल्लागार नेमण्याचे अधिकार एलआयसीला देण्याचा निर्णयही बैठकीत होऊ शकतो. आधी बँकेचा नीट अभ्यास करा व नंतर विविध परवानग्यांसाठीची प्रक्रिया सुरू करा, अशा सूचना बोर्डाकडून एलआयसीला दिल्या जाणार आहेत. दरम्यान, आयडीबीआय बँकेतील आणखी ७ टक्के समभाग फ्रेफरन्स शेअरच्या माध्यमातून खरेदी करण्याची प्रक्रिया एलआयसीकडून यापूर्वीच सुरू करण्यात आली आहे. या व्यवहारानंतर त्याबरोबर बँकेतील एलआयसीची एकूण धारकता (होल्डिंग) १४.९ टक्के होईल. सूत्रांनी सांगितले की, एलआयसीची हिस्सेदारी वाढल्यानंतर आयडीबीआय बँकेला मोठ्या प्रमाणात भांडवल उपलब्ध होईल. दुसऱ्या तिमाहीपर्यंत बँकेला नियामकीय भांडवली नियमांची पूर्तता करता येईल.विक्रीसाठी मिळणार दोन हजार शाखाभारतीय विमा नियमन आणि विकास मंडळाने (इरडाई) जूनमध्ये हैदराबाद येथे झालेल्या बैठकीत एलआयसीला आयडीबीआयमधील आपली हिस्सेदारी वाढवून ५१ टक्के करण्यास मंजुरी दिली होती.सध्याच्या नियमानुसार, विमा कंपनी कोणत्याही सूचीबद्ध वित्तीय संस्थेत १५ टक्क्यांपेक्षा जास्त हिस्सेदारी बाळगू शकत नाही. आयडीबीआय बँकेच्या अधिग्रहणाने बँकेला वित्तीय बळ मिळेलच; पण एलआयसीलाही लाभ होईल. आपली उत्पादने विकण्यासाठी एलआयसीला देशभरात २ हजार शाखा उपलब्ध होतील.आयडीबीआयमधील हिस्सेदारी : वाढवून ५१ टक्के करण्याच्या एलआयसीच्या प्रस्तावास केंद्रीय मंत्रिमंडळाने आॅगस्टमध्ये मान्यता दिली होती. आयडीबीआय बँकेत सरकारची हिस्सेदारी ८५.९६ टक्के आहे. जून २0१८ ला संपलेल्या तिमाहीत बँकेला २,४0९.८९ कोटी रुपयांचा तोटा झाला होता. बँकेची सकल अनुत्पादक मालमत्ता ५७,८0७ कोटी रुपये आहे.

टॅग्स :बँक