Join us

हिरे व्यापारी ते फरार, कोट्यवधींची संपत्ती जप्त; आता किती आहे PNB घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सीची संपत्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2025 14:40 IST

Mehul Choksy Networth: पीएनबी कर्ज घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सीला बेल्जियम पोलिसांनी अटक केली आहे. मेहुल चोक्सीवर पंजाब नॅशनल बँकेला (PNB) १४ हजार कोटी रुपयांचा गंडा घातल्याचा आरोप आहे.

Mehul Choksy Networth: पीएनबी कर्ज घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सीला बेल्जियम पोलिसांनी अटक केली आहे. मेहुल चोक्सीवर पंजाब नॅशनल बँकेला (PNB) १४ हजार कोटी रुपयांचा गंडा घातल्याचा आरोप आहे. मेहुल चोक्सीला सीबीआयच्या विनंतीवरून अटक करण्यात आली आणि तो सध्या तुरुंगात आहे. मुंबई न्यायालयानं २३ मे २०१८ आणि १५ जून २०२१ ला जारी केलेल्या वॉरंटच्या धर्तीवर बेल्जिअम पोलिसांनी मेहुल चोक्सीला अटक केली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

मेहुल चोक्सी आणि नीरव मोदी हे दोघेही जानेवारी २०१८ मध्ये भारतातून पळून गेले होते. त्यानंतर काही दिवसांनी पंजाब नॅशनल बँकेत मोठा घोटाळा झाल्याचं प्रकरण समोर आलं. मिळालेल्या माहितीनुसार, मेहुल चोक्सीवर त्याचा भाचा नीरव मोदीसोबत मिळून सुमारे १४ हजार कोटी रुपयांच्या कर्ज घोटाळ्यात सामील असल्याचा आरोप आहे. भारतातून पळून गेल्यानंतर चोक्सीनं अँटिग्वा अँड बारबुडाचं नागरिकत्व घेतलं होत.

मेहुल चोक्सीची नेटवर्थ

मेहुल चोक्सी हा आंतरराष्ट्रीय हिरे व्यापारी होता, त्याचा व्यवसाय भारताव्यतिरिक्त अमेरिका, मध्यपूर्व आणि आग्नेय आशियात पसरला होता. मेहुल चोक्सी हा गीतांजली ग्रुप या ज्वेलरी फर्मचा मालक आहे, ज्याची भारतात सुमारे ४ हजार स्टोअर्स होती.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारत सोडताना मेहुल चोक्सीन स्वत: एका मुलाखतीत त्याच्याकडे २० हजार कोटींची संपत्ती असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर पीएनबी घोटाळा प्रकरणात ईडी आणि सीबीआयनं मालमत्ता जप्त केली होती. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये ईडीनं मेहुल चोक्सीची १२५ कोटी रुपयांची म्हणजेच चोक्सीचे मुंबईतील फ्लॅट, कारखाने, गोदामं अशी मालमत्ता बँकांना परत केली होती. मालमत्ता जप्त केल्यानंतर आपल्याकडे काहीच शिल्लक नसल्याचं मेहुलनं सांगितलं होतं. मात्र, मेहुल चोक्सीकडे आता किती नेटवर्थ आहे, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

सीबीआयच्या विनंतीवरुन अटककेंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) च्या विनंतीवरून ही अटक करण्यात आली आहे. मेहुल चोक्सी २०२१ च्या अखेरीस अँटिग्वामधून पळून गेला होता, त्यानंतर भारतीय तपास यंत्रणा दोन महिने बेल्जियमच्या एजन्सींच्या संपर्कात होत्या. बऱ्याच काळापासून भारतीय तपास यंत्रणा चोक्सीचा शोध घेत होत्या. माहिती असलेल्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तो सध्या बेल्जियममध्ये तुरुंगात आहे. 

भारतीय तपास यंत्रणा चोक्सीच्या मागावर होत्या. चोक्सी बेल्जियममध्ये असल्याचं तपास यंत्रणांना समजलं तेव्हा तेव्हा त्यांनी ताबडतोब तिथल्या सरकारला औपचारिक पत्र पाठवून त्याला अटक आणि प्रत्यार्पणाची मागणी केली. प्रत्युत्तरादाखल, बेल्जियम पोलिसांनी मुंबई न्यायालयानं जारी केलेल्या दोन अटक वॉरंटच्या आधारे चोक्सीला ताब्यात घेतलं. हे वॉरंट २३ मे २०१८ आणि १५ जून २०२१ रोजी जारी करण्यात आलं होतं.

टॅग्स :पंजाब नॅशनल बँक घोटाळा