Join us

वृद्धीदरात घसरण, युद्धामुळे चिंतेचे ढग कायम; वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर व्याजदराबाबत निर्णयाकडे बाजाराचे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2024 07:16 IST

रशिया आणि युक्रेनदरम्यान सुरू असलेल्या युद्धामुळे चिंतेचे ढग आहेतच. यामुळे खनिज तेलाच्या दरात वाढ होत आहे. यामुळे देशांतर्गत महागाई वाढण्याची चिंता वाढली आहे.

प्रसाद गो. जोशी

भारताच्या जीडीपी वाढीचा वेग ५.४ टक्क्यांवर आल्याची प्रतिक्रिया या सप्ताहात बाजाराकडून येण्याची शक्यता असतानाच रिझर्व्ह बँक व्याजदरावर काय निर्णय घेते याकडे लक्ष आहे. नोव्हेंबर महिन्याचे ऑटो विक्रीचे आकडे आणि उत्पादन व सेवा क्षेत्रांचा पीएमआय निर्देशांक यांवरही बाजाराचे लक्ष राहणार आहे.

रशिया आणि युक्रेनदरम्यान सुरू असलेल्या युद्धामुळे चिंतेचे ढग आहेतच. यामुळे खनिज तेलाच्या दरात वाढ होत आहे. यामुळे देशांतर्गत महागाई वाढण्याची चिंता वाढली आहे. गतसप्ताहाच्या अखेरीस जाहीर झालेली जीडीपीची आकडेवारी ही चिंता वाढविणारी आहे. यामध्ये समाधानाची बाब एवढीच की, आजही हा दर सर्वोच्च आहे. मात्र बाजारामध्ये या कमी वाढीची प्रतिक्रिया येऊ शकते.

दरम्यान, या सप्ताहामध्ये रिझर्व्ह बँकेच्या धोरण समितीची बैठक आहे. यात द्वैमासिक व्याजदरावर निर्णय होईल. देशातील सध्याची स्थिती पाहता, व्याजदर कायम राहण्याचीच शक्यता आहे. मात्र बैठकीमध्ये काय चर्चा होते, याकडे बाजाराचे लक्ष लागून राहिले आहे.  या सप्ताहामध्ये उत्पादन व सेवा क्षेत्राच्या पीएमआयची आकडेवारी जाहीर होणार आहे. यावरून देशाची आर्थिक गाडी कोणत्या दिशेने धावत आहे, ते समजून येऊ शकेल. याबरोबरच अमेरिका आणि चीनमधील पीएमआयवरही बाजाराची नगर राहणार आहे. 

बाजार वाढल्याने गुंतवणूकदार श्रीमंत

गतसप्ताहामध्ये प्रारंभी बाजारात घट झाली तरी नंतर बाजार वाढला. बाजारात नाेंदणीकृत कंपन्यांचे बाजार भांडवल १३ लाख ९७ हजार ५९८.३१ कोटी रुपयांनी वाढले आहे. एकूण बाजार भांडवल आता ४,४६,६८,६५०.३५ कोटी रुपयांवर पोहोचले आहे.