Join us

सायरस मिस्त्रींची हकालपट्टी बेकायदेशीर, टाटा व्यवस्थापनाला धक्का 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2019 16:22 IST

रतन टाटा यांच्यानंतर टाटा कंपनीच्या चेअरमन पदाची धुरा हाती घेणाऱ्या मिस्त्री यांची चेअरमनपदावरून उचलबांगडी करण्यात आली होती.

मुंबई - सायरस मिस्त्री यांची टाटा कंपनीच्या चेअरमन पदावरून केलेली हकालपट्टी बेकायदेशीर ठरवण्यात आली आहे. राष्ट्रीय कंपनी कायदे लवादाने हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. त्यामुळे टाटा सन्समध्ये सायरस मिस्त्री यांच्या पुनर्नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. रतन टाटा यांच्यानंतर टाटा कंपनीच्या चेअरमन पदाची धुरा हाती घेणाऱ्या मिस्त्री यांची तीन वर्षांपूर्वी २४ ऑक्टोबर २०१६ रोजी चेअरमनपदावरून उचलबांगडी करण्यात आली होती. या विरोधात सायरस मिस्त्री यांनी राष्ट्रीय कंपनी कायदे लवादाकडे दाद मागितली होती. त्यावर सुनावणी करताना यांनी राष्ट्रीय कंपनी कायदे लवादाने मिस्त्री यांची हकालपट्टी बेकायदेशीर असल्याचा निर्णय दिला. 

04 जुलै 1968 रोजी जन्मलेल्या सायरस मिस्त्री यांनी लंडनमधील इंपेरियल कॉलेज आॅफ सायन्स, टेक्नॉलॉजी आणि मेडिसिनमध्ये सिव्हिल इंजिनीअरिंगची पदवी प्राप्त केलेली आहे. त्यानंतर त्यांनी लंडन बिझनेस स्कूलमध्ये एमबीए केले.  नोव्हेंबर 2011मध्ये सायरस मिस्त्री यांची टाटांचे वारसदार म्हणून डेप्युटी चेअरमनपदी नेमणूक करण्यात आली होती. रतन टाटा निवृत्त झाल्यावर २९ डिसेंबर २०१२ रोजी सायरस मिस्त्री यांची टाटा समुहाच्या चेअरमनपदी नियुक्ती करण्यात आली होती.  

टॅग्स :टाटाव्यवसाय