Join us

OTP शेअर केला नाही, फक्त एक कॉल आला अन् बँक खातं रिकामं; सायबर ठगांनी कसं केलं काम?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 11:45 IST

Cyber Crime : ऑनलाइन पेमेंटच्या वाढत्या ट्रेंडमुळे देशात सायबर फसवणुकीच्या घटनांमध्येही वाढ होत आहे. आता तुम्ही ओटीपी दिला नाही तरी तुमच्या खात्यातून पैसे काढून घेतले जाऊ शकतात.

Cyber Crime : देशात सायबर फसवणुकीच्या घटना थांबायचं नाव घेताना दिसत नाही. हे प्रकार रोखण्यासाठी सरकारने कॉलरट्यूनला सूचना द्यायला सुरुवात केली. मात्र, त्यानंतरही फारसा फरक पडलेला दिसत नाही. सायबर ठग रोज नवनवीन पद्धती शोधत आहेत. तुमच्याकडून OTP न घेताही तुमचं बँक खाते रिकामं होऊ शकते. सायबर ठग आता कॉल मर्जिंग किंवा कॉन्फरन्स कॉलद्वारे लोकांच्या कष्टाचे पैसे लुटत आहेत. या प्रकारात तुम्हाला OTP देखील विचारला जात नाही. फक्त एक कॉल आणि तुमच्या खात्यातील पैसे काही मिनिटांत चोरले जातात.

ओटीपी आणि वैयक्तिक तपशील शेअर न करण्याबाबत तुम्हाला आरबीय किंवा बँकांचे संदेश येत असतील. पण सायबर घोटाळेबाजांनी असा प्रकार शोधून काढला आहे की, तुम्ही तुमचा ओटीपी कधी शेअर केला आहे, हे तुम्हाला कळणारही नाही. सायबर ठग कॉल मर्जिंग किंवा कॉन्फरन्स कॉलद्वारे लोकांना फसवणुकीचे बळी बनवत आहेत. सायबर तज्ज्ञ म्हणाले की सायबर ठगांकडे किमान डझनभर असे मार्ग आहेत, ज्याद्वारे ते आपला फोन सहजपणे हॅक करू शकतात. यामध्ये कॉल मर्जिंग, कॉल फॉरवर्डिंग, क्यूआर कोड, स्क्रीन शेअरिंग आणि अ‍ॅप्सद्वारे फसवणूक यांचा समावेश आहे.

कॉल मर्जिंग म्हणजे काय?यामध्ये तुम्हाला अज्ञात क्रमांकावरुन कॉल केला जातो. तुमच्याच मित्राने नंबर दिला असून एका कार्यक्रमाची पत्रिका देण्यासाठी फोन केल्याचे सांगितले जाते. दरम्यान तुम्हाला दुसऱ्या नंबरवरुन आणखी एक कॉल केला जातो. हा आपल्याच मित्राचा कॉल असून तुम्ही तो मर्ज करा, असे अज्ञात व्यक्तीकडून विनंती केली जाते. तुम्ही कॉल मर्ज करताच तुमच्या खात्यातून पैसे काढले जातात. तुमचे व्हॉट्सॲप, फेसबुक किंवा गुगल अकाउंट हॅक होऊ शकते.

आता तुम्हाला वाटेल मी कोणताही OTP दिला नाही, कोणत्याही लिंकवर क्लिक केले नाही किंवा कोणतेही ॲप इंस्टॉल केले नाही, तरीही तुमचे खाते हॅक कसे झाले? कारण, तुम्हाला आलेला दुसरा कॉल हा ओटीपीचा होता. पूर्वी एसएमएसद्वारे ओटीपी येतात, ते आता कॉलवरही येऊ लागले आहेत. तुम्ही कॉल मर्ज करताच, सायबर ठगला OTP कळेल. तुमच्या लक्षात येईपर्यंत तुमच्या खात्यातून पैसे काढून घेतलेले असतात. अनेकदा कॉलमध्ये अनावश्यक आवाज येत असल्याने तुम्हाला ओटीपी शेअर केल्याचेही ऐकू येत नाही.

गुगलवर संपर्क क्रमांक शोधण्याचा धोकाअनेकदा आपण ग्राहक सेवा केंद्राचे नंबर शोधण्याठी गुगल सर्चचा वापर करतो. मात्र, यातून आता सायबर फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. एका केसमध्ये एका तरुणाने गुगलवर सर्च करून दिल्लीतील एका हॉटेलचा नंबर मिळवला. फोन केल्यावर त्याने रूम बुक करण्यास सांगितले. बुकरने कार्डचे तपशील मागितले. त्यावर तरुणाने मी करतो असे सांगितले. त्यानंतर त्याने ऑनलाईन पैसे पाठवून रूम बूक केली. मात्र, प्रत्यक्षात हॉटेलला गेल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे तरुणाच्या लक्षात आले. 

टॅग्स :सायबर क्राइमबँकिंग क्षेत्रबँक