Join us  

या २१ बँकांच्या ग्राहकांना मिळेल पाच लाखांपर्यंत रक्कम

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2021 12:37 PM

केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी बँकांमधील पाच लाखांपर्यंतच्या ठेवी सुरक्षित असल्याचा खुलासा यापूर्वीच केला होता.

नवी दिल्ली :  घोटाळे, अनियमितता आणि अन्य कारणांमुळे आर्थिक निर्बंध लादलेल्या २१ बँकांच्या ठेवीदारांना ९० दिवसांत (म्हणजेच नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत) पाच लाख रुपयांपर्यंतच्या अडकलेल्या ठेवींची भरपाई मिळणार आहे. पीएमसी बँकेचा यात समावेश आहे.रिझर्व्ह बँकेने आर्थिक निर्बंध लादल्यामुळे  हजारो खातेधारकांचे कोट्यवधी रुपये बँकांत अडकून पडले आहेत.  विमा महामंडळाच्या कायद्यात सुधारणा करणारे विधेयक मंजूर झाल्यानंतर संबंधित बँकांना विमा भरपाईसाठीची आवश्यक प्रक्रिया १५ ऑक्टोबर २०२१ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या बँकांच्या ठेवीदारांना २९ नोव्हेंबर २०२१ पूर्वी ठेवींवर पाच लाखांपर्यंतची विमा भरपाई मिळणार आहे.केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी बँकांमधील पाच लाखांपर्यंतच्या ठेवी सुरक्षित असल्याचा खुलासा यापूर्वीच केला होता. तसेच अडचणीत असलेल्या बँकांच्या ठेव विमा व कर्ज हमी महामंडळाअंतर्गत (डीआयसीजीसी) ठेवीदारांना पाच लाखांपर्यंतची रक्कम ९० दिवसांत मिळण्याची हमी दिली होती.बँकांना ४५ दिवसांत करावा लागेल विमा दाव्यासाठी अर्ज डीआयसीजीसीअंतर्गत  बँकांना ठेवीवरील विमा भरपाईची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार ४५ दिवसांत बँकांना विमा दाव्यासाठी अर्ज करावा लागेल.  याबाबतची छाननी आणि दावा प्रक्रिया २९ नोव्हेंबर २०२१ पूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

या बँकांच्या ठेवीदारांना मिळणार दिलासा -ठेव विमा महामंडळाने बँकांमधील पाच लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींना विमा संरक्षण दिले आहे. त्याअंतर्गत ही भरपाई मिळणार असलेल्या बँका पुढीलप्रमाणे आहेत : अदूर को-ऑप. अर्बन बँक, केरळ, बिदर महिला अर्बन को-ऑप बँक, महाराष्ट्र, सिटी को-ऑप बँक, महाराष्ट्र, हिंदू को-ऑप बँक, पंजाब, कपोल को-ऑप बँक, महाराष्ट्र, मराठा सहकारी बँक, महाराष्ट्र, मिलाथ को-ऑप बँक, कर्नाटक, नीड्स ऑफ लाइफ को-ऑप बँक, महाराष्ट्र, पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील बँक, महाराष्ट्र, पीपल्स को-ऑप बँक, कानपूर, उत्तर प्रदेश, पंजाब ॲण्ड महाराष्ट्र को-ऑप बँक (पीएमसी बँक) महाराष्ट्र, रूपी को-ऑप बँक, महाराष्ट्र, श्री आनंद को-ऑप बँक, महाराष्ट्र, सीकर अर्बन को-ऑप बँक, राजस्थान, श्री गुरुराघवेंद्र सहकारी बँक, कर्नाटक, दि मुधोळ को-ऑप बँक कर्नाटक, मंठा अर्बन को-ऑप बँक, महाराष्ट्र, सर्जेरावदादा नाईक शिराळा सहकारी बँक, महाराष्ट्र, इंडिपेंडन्स को-ऑप बँक, नाशिक, महाराष्ट्र, डेक्कन अर्बन को-ऑप बँक, कर्नाटक, गृह को-ऑप बँक, मध्य प्रदेश.  

टॅग्स :बँकपैसा