जीएसटीचा फायदा आता लोकांना मिळणार आहे. यामुळे सर्वच क्षेत्रात खरेदीला मोठा वेग येणार आहे. याची तयारी ऑटो, इलेक्ट्रीक, इलेक्ट्रॉनिकसह सर्वच कंपन्या करत आहेत. अशातच दूधही आता स्वस्त होणार आहे. महत्वाचे म्हणजे दूध बऱ्याच वाढीनंतर पहिल्यांदाच काही रुपयांनी स्वस्त होणार आहे. हा एक मोठा दिलासा ठरणार आहे. जीएसटी कपातीचा फायदा आता मदर डेअरीने जाहीर केला आहे. २२ सप्टेंबरपासून जीएसटी लागू होणार असला तरी मदर डेअरीने दूध, दही, लोणी, पनीर आदी उत्पादनांचे दर आताच कमी केले आहेत.
मदर डेअरीचे पॅकेज्ड दूध आता २ रुपयांनी प्रति लीटर स्वस्त मिळणार आहे. मदर डेअरीने त्यांच्या १ लिटर टोन्ड टेट्रा पॅक दुधाची किंमत ७७ रुपयांवरून ७५ रुपयांपर्यंत कमी केली आहे. याशिवाय तूप आणि चीजसह इतर वस्तूंच्या किमतीही कमी करण्यात आल्या आहेत. दुधाचे ४५० मिली पॅक आता ३३ रुपयांऐवजी ३२ रुपयांना उपलब्ध होणार आहे.
तसेच फ्लेवर्सच्या मिल्कशेकच्या १८० मिली पॅकची किंमत ३० रुपयांवरून २८ रुपयांवर करण्यात आली आहे. २०० ग्रॅम पनीरचे पॅकेट आता ९५ रुपयांऐवजी ९२ रुपयांना तर ४०० ग्रॅम पनीरचे पॅकेट आता १८० रुपयांऐवजी १७४ रुपयांना मिळणार आहे. मलाई पनीर देखील २०० ग्रॅम पाकिटाची किंमत १०० रुपयांवरून ९७ रुपये करण्यात आली आहे. जीएसटीपूर्वीच हे दर कमी करण्यात येत आहेत.