Join us
Daily Top 2Weekly Top 5

Crude Oil Price: कच्च्या तेलाच्या किमतीत ९ टक्क्यांची मोठी घसरण; डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानंतर लागलं 'लोअर सर्किट'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 08:35 IST

Crude Oil Lower Circuit Donald Trump: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी एक मोठं विधान केलं. यानंतर कच्च्या तेलाच्या किमती जोरदार आपटल्या.

Crude Oil Lower Circuit Donald Trump: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी एक मोठं विधान केलं. इराणचे पॉवर प्लांट आणि ऊर्जा पायाभूत सुविधांवर पुढील ५ दिवसांपर्यंत कोणताही हल्ला केला जाणार नाही, असं ते म्हणाले. ट्रम्प यांच्या या विधानानंतर कच्च्या तेलाच्या किमतीतील सुरुवातीची वाढ केवळ संपुष्टात आली नाही, तर किमतींना 'लोअर सर्किट' देखील लागलं. सोमवारी, ट्रम्प यांच्या विधानानंतर वायदा बाजारात कच्च्या तेलाच्या किमती ९ टक्क्यांच्या घसरणीसह ८,४३१ रुपये प्रति बॅरलवर आल्या.

MCX वर कच्च्या तेलाच्या किमतीत ९% घसरण

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) कच्च्या तेलाचा एप्रिलमध्ये डिलिव्हरीचा कॉन्ट्रॅक्ट सुरुवातीला ३६२ रुपये (४ टक्के) वाढीसह ९,६२० रुपये प्रति बॅरलच्या उच्चांकी स्तरावर पोहोचला होता. मात्र, त्यानंतर किमतींचा कल बदलला आणि त्या ८२७ रुपये (९ टक्के) घसरून ८,४३१ रुपये प्रति बॅरलपर्यंत खाली आल्या. हे त्या दिवसातील व्यवहारातील लोअर सर्किट होतं. विश्लेषकांच्या मते, इराणच्या ऊर्जा केंद्रांवरील संभाव्य हल्ले रोखण्याच्या अमेरिकेच्या निर्णयामुळे भू-राजकीय तणाव कमी झाला आणि किमतीत हा वेगवान बदल पाहायला मिळाला.

जागतिक बाजारपेठेतही दर कोसळले

जागतिक स्तरावर, वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट (WTI) कच्च्या तेलाचा मे डिलिव्हरीचा कॉन्ट्रॅक्ट ७.२४ डॉलर किंवा ७.३७ टक्क्यांच्या घसरणीसह ९०.९९ डॉलर प्रति बॅरलवर आला. तर, मे डिलिव्हरीसाठी ब्रेंट क्रूडचा भाव ६.७० डॉलर किंवा ६.३० टक्क्यांच्या घसरणीसह ९९.७१ डॉलर प्रति बॅरलवर व्यवहार करत होता.

डोनाल्ड ट्रम्प नेमके काय म्हणाले?

सोमवारी डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या निवेदनात म्हटलं की, "मला हे सांगताना आनंद होत आहे की, गेल्या दोन दिवसांत अमेरिका आणि इराण यांच्यात मध्यपूर्वेतील आमचे परस्पर शत्रुत्व पूर्णपणे संपवण्याबाबत अत्यंत चांगली चर्चा झाली आहे. ही सखोल, तपशीलवार आणि विधायक चर्चा आठवडाभर सुरू राहणार असल्यानं, मी डिपार्टमेंट ऑफ वॉरला, इराणचं पॉवर प्लांट आणि ऊर्जा पायाभूत सुविधांविरुद्धचे कोणतेही आणि सर्व लष्करी हल्ले ५ दिवसांसाठी लांबणीवर टाकावेत, असं सांगितलं आहे. हा निर्णय सध्या सुरू असलेल्या बैठका आणि चर्चेच्या यशावर अवलंबून असेल," असं ते म्हणाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Crude Oil Prices Plummet 9% After Trump's Statement; 'Lower Circuit' Triggered

Web Summary : Trump's statement halting attacks on Iranian energy facilities triggered a 9% drop in crude oil prices, hitting a lower circuit. MCX crude oil futures fell to ₹8,431 per barrel. Global benchmarks, WTI and Brent Crude, also saw significant declines amid eased geopolitical tensions.
टॅग्स :डोनाल्ड ट्रम्पखनिज तेलअमेरिका-इस्रायल-इराण वॉर