Join us

वैद्यकीय उपकरणांची टंचाई; सेमीकंडक्टर चिप्स मिळेना, किमतीही वाढल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2021 05:46 IST

अनेक उपकरणांच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे, तसेच अनेक उपकरणे बाजारात उपलब्धच नाहीत.

मुंबई : सेमीकंडक्टर चिप्सची प्रचंड टंचाई निर्माण झाल्यामुळे प्राणरक्षक वैद्यकीय उपकरणे आणि मेडिटेक उद्योगास मोठा फटका बसत आहे. या उपकरणांची उपलब्धता अनिश्चित झाली असून, पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. अनेक उपकरणांच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे, तसेच अनेक उपकरणे बाजारात उपलब्धच नाहीत.उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले की, गंभीर रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या शेकडो उपकरणांसह अतिदक्षता कक्षातील उपकरणांची टंचाई निर्माण झाली आहे. व्हेंटिलेटर्स, डिफायब्रिलेटर्स, इमेजिंग मशिन्स, ग्लुकोज, ईसीजी, ब्लडप्रेशर मॉनिटर्स आणि रोपणयोग्य पेसमेकर्स यांचा त्यामध्ये समावेश आहे.ही परिस्थिती अशीच राहिली तर या उपकरणांच्या उपलब्धतेचा प्रश्न आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त होत आहे. या टंचाईचा परिणाम म्हणून वर्षअखेरपर्यंत उपकरणांच्या किमती २० टक्क्यांनी वाढतील, असा या क्षेत्रातील जाणकारांचा अंदाज आहे.ॲनास्थेशिया मशिन्स, पेशन्ट मॉनिटर्स आणि आयसीयू व्हेंटिलेटर्सची विक्री करणारी कंपनी ‘बीपीएल मेडिकल टेक्नॉलॉजीज’चे सीईओ आणि एमडी सुनील खुराणा यांनी सांगितले की, अद्याप तरी आम्ही मागणीची पूर्तता करून किमती नियंत्रणात ठेवल्या आहेत. मात्र, अनिश्चितता कायम आहे. वर्षअखेरपर्यंत आम्हाला उपकरणांच्या गंभीर टंचाईचा सामना करावा लागू शकतो. कारण तोपर्यंत मायक्रोप्रोसेसर चिप्सचा सध्याचा साठा संपुष्टात येईल.या चिप्स चीन, जपान, तैवान आणि अमेरिका येथून आयात केल्या जातात. आयसीयू उपकरणांची उत्पादक कंपनी ‘स्कॅनरे टेक्नॉलॉजीज’चे एमडी विश्वप्रसाद अल्वा यांनी सांगितले की, इलेक्ट्रॉनिक्स आणि मेडिटेक क्षेत्रात खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर होण्यासाठी सेमीकंडक्टर फॅब्रिकेशन प्लँट टाकण्याची मागणी आम्ही केंद्राकडे २०१२ पासून करीत आहोत. तथापि, केंद्र सरकारने त्याकडे सातत्याने दुर्लक्ष केले. आपण निद्राधीन होतो, तेव्हा चीनने या क्षेत्रात आघाडी घेतली. आत्मनिर्भरतेसाठी स्वतंत्र मंत्रालय आणि अराजकीय तज्ज्ञांचे पॅनल स्थापन केल्यास १० वर्षांत आपण यात स्वयंपूर्ण होऊ शकतो.