Join us

क्रेडिट कार्डची थकबाकी वाढतेय? मग हे नक्कीच करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2025 12:41 IST

जेव्हा क्रेडिट कार्डची थकबाकी वाढायला लागते, तेव्हा व्याजाचा भार अधिकाधिक वाढत जातो आणि आपण आर्थिक अडचणीत सापडतो.

चंद्रकांत दडसवरिष्ठ उपसंपादकआजच्या पिढीला प्रत्येक गोष्ट ईएमआयवर तसेच क्रेडिट कार्डवर घेण्याची सवय लागली आहे. ऑनलाइन खरेदी, तात्पुरते पैसे हातात येण्यासाठी अनेकजण क्रेडिट कार्डचा सर्रास वापर करत आहेत; पण याचा अतिरेक झाल्यामुळे क्रेडिट कार्डची थकबाकी प्रचंड वाढली आहे. ही थकबाकी गेल्या वर्षभरात तब्बल ४४ टक्क्यांनी वाढली आहे. एकाच वेळी अनेक कर्जे घेतल्याचा हा परिणाम आहे. जेव्हा क्रेडिट कार्डची थकबाकी वाढायला लागते, तेव्हा व्याजाचा भार अधिकाधिक वाढत जातो आणि आपण आर्थिक अडचणीत सापडतो. अशा वेळी यातून बाहेर कसे पडायचे ते जाणून घेऊ...

सर्वप्रथम मासिक खर्चाचा आढावा घ्या. क्रेडिट कार्ड कुठे-कुठे वापरले, अनावश्यक खरेदी कुठे झाली, याचा अभ्यास करा. संकट येण्याच्या आधीच बदल करून उपाययोजना करा.

दर महिन्याचे बजेट तयार करून त्यातील वायफळ खर्च बंद करा. घर चालवतानाही काटकसर आवश्यक असतेच. बजेटनुसारच क्रेडिट कार्डचा वापर ठरवा.फक्त 'मिनिमम पेमेंट' भरल्याने व्याज वाढत जाते. त्यामुळे शक्य तेवढी जास्त रक्कम भरण्याचा प्रयत्न करा. काही महिन्यांमध्ये तुम्हाला पुन्हा कर्जमुक्त होता येईल.

अनेक बँका थकबाकीवर ईएमआयची सुविधा देतात. यात व्याजदर तुलनेत कमी असतो आणि तुम्ही ठरावीक हप्त्यांमध्ये रक्कम परत करू शकता.

क्रेडिट कार्डवरील व्याजदर हे वार्षिक ३० टक्क्यांपेक्षा जास्त असू शकतात. त्यापेक्षा कमी व्याजदरावर पर्सनल लोन घेऊन थकबाकी फेडल्यास तुमच्यावरचा व्याजाचा भार हलका होतो.

जर परिस्थिती खूपच बिघडली असेल, तर कंपनीशी खुलेपणाने चर्चा करा. 'डेब्ट सॅटलमेंट'द्वारे तुम्हाला थोडा श्वास घेता येऊ शकतो.

कर्ज फेडल्यानंतर पुन्हा तीच आर्थिक चूक टाळा. बचत, गुंतवणूक आणि आर्थिक शिस्त लावणे हे दीर्घकालीन उपाय आहेत. प्रत्येक खरेदीपूर्वी स्वतःला विचारा की, हा खर्च खरेच आवश्यक आहे का? आणि शेवटी आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. 

टॅग्स :व्यवसाय