Credit Score : पूर्वी क्रेडिट स्कोअरचा संबंध फक्त बँकेतून कर्ज घेण्याशी संबंधित होता. जर तुम्हाला भविष्यात कर्ज हवे असेल तर तुमचा स्कोअर चांगला असावा, हे सर्वांनाच माहिती आहे. मात्र, अलीकडच्या काळात क्रेडिट स्कोअरला स्टेटस सिम्बॉल मानलं जाऊ लागलं आहे. काही दिवसांपूर्वी लग्नासाठी मुलांचा क्रेडिट स्कोअर तपासला जात असल्याची बातमी व्हायरल झाली होती. यात आता आणखी एकाची भर पडली आहे. आता नोकरी मिळवण्यासाठी देखील तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असणं आवश्यक आहे.
तुम्हाला जर चांगली नोकरी हवी असेल तर तुम्ही काय करता? तर नोकरीसाठी लागणारे आवश्यक स्किल्स शिकण्यावर भर देता. मुलाखतीची तयारी करता. एक चांगला CV तयार करता. कुणाचा रेफरन्स मिळत असेल तर त्यासाठीही प्रयत्न केले जातात. पण ऑनलाईन पेमेंट प्लॅटफॉर्म CRED मध्ये नोकरी मिळवण्यासाठी ह्या गोष्टी पुरेशा नाहीत. क्रेडचे संस्थापक कुणाल शाह म्हणाले की, त्यांच्या कंपनीत नोकरी मिळवण्यासाठी उमेदवारांचा क्रेडिट स्कोअरही चांगला असायला हवा.
क्रेडचे संस्थापक कुणाल शाह म्हणाले की त्यांची कंपनी CRED फक्त ७५०0 किंवा त्यापेक्षा जास्त क्रेडिट स्कोअर असलेल्यांनाच नोकऱ्या देते. या भूमिकेचं समर्थन करताना शाह म्हणाले, की चांगला क्रेडिट स्कोर जबाबदार क्रेडिट सवयींवर अवलंबून असतो. लोकांनी आपल्या आर्थिक सवयींवर लक्ष ठेवले नाही तर देशाचा विकास होणे कठीण होते. कर्मचाऱ्यांचा क्रेडिट हिस्ट्री चांगली नसल्यास कंपनीला क्रेडिट स्कोअर तयार करण्यासाठी ३ महिन्यांचा वेळ देते.
क्रेडिट स्कोअर आणि सिबील स्कोर समान आहेत का?बरेच लोक क्रेडिट स्कोअर आणि सिबील स्कोर समान असल्याचे मानतात. पण, हे पूर्णपणे बरोबर नाही. वास्तविक, क्रेडिट स्कोअर ही एक व्यापक संकल्पना आहे, जी एखाद्या व्यक्तीचा क्रेडिट इतिहास आणि कर्ज किंवा क्रेडिट कार्ड पेमेंटची विश्वासार्हता दर्शवते. दुसरीकडे, सिबील स्कोर केवळ TransUnion CIBIL नावाच्या क्रेडिट ब्युरोद्वारे जारी केला जातो.