virtual aadhaar id : आधार कार्ड हे आता केवळ ओळखपत्र राहिले नाही. तर या कागदपत्राशिवाय तुमचं पानही हलणार नाही, अशी स्थिती आहे. शाळेच्या प्रवेशापासून बँकेच्या व्यवहारांपर्यंत सर्व महत्त्वाची कामे आधारशिवाय होत नाहीत. पण, यामुळे गैरप्रकारही वाढले आहेत. बँक खाते आणि रेशनकार्डशी आधार लिंक झाल्यामुळे फसवणूकही मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळेच आता आधार क्रमांक देताना अनेकांची धडधड वाढते. पण, जर तुमची अनेक महत्त्वाची कामे तुमचा आधार क्रमांक न देताही झाली तर? होय, हे शक्य आहे. यासाठी तुम्हाला फक्त व्हर्च्युअल आधार आयडी बनवावा लागेल.
काय आहे व्हर्च्युअल आधार आयडी?व्हर्च्युअल आधार आयडी तयार करण्यासाठी तुम्हाला कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. व्हर्च्युअल आयडी हा १६ अंकी क्रमांक आहे. हा व्हर्च्युअल आयडी आधार क्रमांकाच्या जागी प्रमाणीकरण आणि ई-केवायसीसाठी वापरला जाऊ शकतो. कोणत्याही आधार कार्डधारकाचा आधार क्रमांक व्हर्च्युअल आयडीद्वारे ओळखता येत नाही. बँक खाते उघडणे, सरकारी सेवांसाठी अर्ज करणे, ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे, आधार पीव्हीसी कार्ड किंवा ई-आधार डाउनलोड करणे, पासपोर्टसाठी अर्ज करणे आणि विमा पॉलिसी खरेदी करणे यासह अनेक कामांसाठी हा व्हर्च्युअल आयडी वापरला जाऊ शकतो.
व्हर्च्युअल आयडी कसा तयार करायचा?
- सर्वप्रथम भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाच्या अधिकृत वेबसाइटवर जा.
- वेबसाइटच्या तळाशी असलेल्या आधार सेवांमध्ये व्हर्च्युअल आयडी (व्हीआयडी) जनरेटरवर क्लिक करा.
- आता आधार कार्ड क्रमांक आणि कॅप्चा प्रविष्ट करा.
- आता नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर प्राप्त झालेला OTP प्रविष्ट करा.
- आता तुम्हाला तुमचा व्हर्च्युअल आयडी स्क्रीनवर दिसेल.
- हा व्हर्च्युअल आयडी नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरही पाठवला जातो.
एसएमएसद्वारेही मिळवता येतो व्हर्च्युअल आयडीअधिकृत वेबसाइट व्यतिरिक्त, तुम्ही तुमच्या फोनवरून एसएमएस पाठवून व्हर्च्युअल आयडी देखील मिळवू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरून आधार क्रमांकाचे शेवटचे ४ अंक RVID सोबत टाईप करून १९४७ वर पाठवावे लागतील. उदाहरणार्थ, जर आधार कार्डचे शेवटचे ४ अंक ४५६५ असतील तर संदेशाचा मजकूर RVID ४५६५ असावा.