Join us

महंगाई डायन! आता कपडेही महागणार; कॉटनच्या किमती वर्षभरात दुपटीनं वाढल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2022 15:30 IST

गव्हाच्या निर्यातीवरुन वाद सुरू असतानाच आता कापसाच्या निर्यातीचंही टेन्शन उभं राहिलं आहे. कापसाच्या किमतीनं सर्वाच्च पातळी गाठली आहे.

नवी दिल्ली-

गव्हाच्या निर्यातीवरुन वाद सुरू असतानाच आता कापसाच्या निर्यातीचंही टेन्शन उभं राहिलं आहे. कापसाच्या किमतीनं सर्वाच्च पातळी गाठली आहे. गुजरातच्या राजकोटमध्ये प्रति क्विंटल कापसासाठी १३,४०५ रुपयांची बोली लागली. एका वर्षापूर्वी हाच भाव ७ हजार रुपये इतका होता. शेतकऱ्यांच्या दृष्टीनं पाहायचं झालं तर कापसाला मिळणारा चांगला भाव ही चांगलीच गोष्ट आहे. कारण वर्षभरात कापसाची किंमत दुप्पट झाली आहे. पण दुसरीकडे कापसाच्या किमती वाढल्यानंतर कपडे महाग झाले आहेत आणि याचा परिणाम ग्राहकांच्या खिशावर होत आहे. कापसाच्या वाढत्या किमतीमुळे टेक्सटाइल इंडस्ट्रीसमोर मोठं संकट निर्माण झालं आहे. 

एका बाजूला कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाली आहे. तर दुसरीकडे कपड्यांची मागणी घटण्याची टांगती तलवार अजूनही कायम आहे. टेक्सटाइल इंडस्ट्रीमध्ये कच्च्या मालावरील खर्चात दुपटीनं वाढ झाली आहे. गेल्या वर्षी मे मध्ये एक कँडी कापसासाठी ४८ हजार रुपये मोजावे लागत होते. हाच भाव यावेळी ९५ हजारापर्यंत पोहोचला आहे. या वर्षात संपूर्ण जगभरातच कापूस महागला आहे आणि यातच कच्च्या तेलाच्या किमती वधारल्यानं सिंथेटिक फायबरच्या किमती देखील गगनाला भिडल्या आहेत. 

कमी उत्पादनाची शक्यतास्थानिक पातळीवर यंदाच्या वर्षात उत्पादनाबाबत जो अंदाज व्यक्त करण्यात आला होता त्यापेक्षाही कमी उत्पादन होईल असं म्हटलं जात आहे. याआधी देशात ३४३ लाख गाठी कापसाचं उत्पादन होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. पण त्यात आता घट होऊन ३३५ लाख गाठी इतकं करण्यात आलं आहे. 

कोरोना लॉकडाउन संपल्यानंतर यंदाच्या वर्षात कापसाच्या मागणीत वाढ होण्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षी ३३५ लाख गाठी कापसाची विक्री झाली होती आणि यंदाच्या वर्षात ३४० लाख गाठीचा अंदाज आहे. गेल्या वर्षीचा बाकी राहिलेला जवळपास ७५ लाख गाठी कापूस पकडला तर स्थानिक मागणीची पूर्तता होऊ शकते. पण कापसाच्या निर्यातीनं टेक्सटाइल उद्योगाची चिंता वाढली आहे. ऑक्टोबरमध्ये नवी खेप येण्यास सुरुवात झाल्यापासून मार्चच्या अखेरपर्यंत देशातून ३५ लाख गाठी कापूस निर्यात करण्यात आला आहे.

टॅग्स :कापूस