Join us

Coronavirus: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे इंधनाच्या विक्रीमध्ये सात टक्क्यांनी घट, विमान इंधनाला बसला जबर फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2021 09:45 IST

fuel sales in India: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशाच्या विविध भागांमध्ये लागू करण्यात आलेले निर्बंध, तर काही राज्यांमधील लॉकडाऊनमुळे पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीमध्ये मोठी घट झाली आहे.

 नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशाच्या विविध भागांमध्ये लागू करण्यात आलेले निर्बंध, तर काही राज्यांमधील लॉकडाऊनमुळे पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीमध्ये मोठी घट झाली आहे. मागील वर्षी एप्रिल महिन्यात लॉकडाऊन असल्यामुळे फारशी उलाढाल झालेली नव्हती. त्यामुळे एप्रिल २०१९च्या तुलनेत यंदाच्या विक्रीमध्ये सात टक्क्यांनी कपात झालेली दिसून येत आहे. एप्रिल २०२१ मध्ये देशातील पेट्रोलची विक्री २१.४ लाख टनांची राहिली आहे. ऑगस्ट, २०२० नंतरची ही सर्वांत कमी विक्री आहे. मार्च महिन्यामध्ये झालेल्या विक्रीशी तुलना करता ६.३ टक्क्यांनी विक्री कमी झालेली दिसून येत आहे. एप्रिल २०१९ मधील विक्रीच्या तुलनेत यंदा पेट्रोलची विक्री ४.१ टक्क्यांनी कमी झाली आहे. एप्रिल २०२० मध्ये देशात केवळ ८ लाख ७२ हजार टनांची पेट्रोल विक्री झाली होती. वाहनांसाठी सर्वाधिक वापरले जाणारे इंधन असलेल्या डिझेलची विक्री ही एप्रिलमध्ये केवळ ५०.९ लाख टनांची झाली. मार्च महिन्याच्या तुलनेत ती १.७ टक्के, तर एप्रिल २०१९ च्या तुलनेत ९.९ टक्क्यांनी कमी झाली आहे. एप्रिल २०२० मध्ये केवळ २८.४० लाख टन डिझेलची विक्री झाली होती. विमानासाठी लागणाऱ्या इंधनामध्येही मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. गेल्या वर्षभरापासून विमानसेवा मोठ्या प्रमाणात बंद असल्यामुळे ही घट झाली आहे. एप्रिलमध्ये हे इंधन ३ लाख ७७ हजार टन विकले गेले. मार्च महिन्यापेक्षा त्यात ११.५ टक्के, तर एप्रिल २०१९ पेक्षा ३९.१ टक्क्यांची घट नोंदविली गेली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे मार्च महिन्यामध्येच इंधनाच्या खपामध्ये घट व्हायला प्रारंभ झाला होता. मात्र, पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांच्या प्रचारांमुळे इंधनाच्या खपामध्ये फारशी घट दिसून आली नाही. 

एलपीजीची विक्रीही घटलीमार्च महिन्याच्या तुलनेत द्रवीभूत पेट्रोलियम गॅस (एलपीजी)ची विक्री ३.३ टक्क्यांनी कमी होऊन २१ लाख टनांवर आली आहे. एप्रिल २०१९ मध्ये एलपीजीची विक्री १८.८ लाख टन झाली होती. त्या तुलनेत एप्रिलमध्ये ११.६ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

टॅग्स :पेट्रोलव्यवसाय