Join us  

Coronavirus : तो मी नव्हेच; सोशल मीडियावरील 'त्या' व्हायरल मेसेजवर रतन टाटांनी केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2020 4:02 PM

रतन टाटांच्या नावे एक मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यावर आता खुद्द रतन टाटांनीच स्पष्टीकरण दिलेलं आहे.

नवी दिल्लीः कोरोना व्हायरसचं संकट वाढतच चाललं आहे. कोरोनाला रोखण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. कोरोनाच्या लढ्यात मोदींच्या पीएम केअर्स फंडालाही अनेक उद्योगपतींनी कोट्यवधींची मदत दिलेली आहे. टाटा समूहानंही कोरोनाग्रस्तांसाठी १५०० कोटींच्या मदतीची घोषणा केल्यानं रतन टाटा चर्चेत आले होते. त्यावेळी रतन टाटांचं सोशल मीडियावर कौतुकही करण्यात आलं होतं. त्याच पार्श्वभूमीवर रतन टाटांच्या नावे एक मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यावर आता खुद्द रतन टाटांनीच स्पष्टीकरण दिलेलं आहे.तज्ज्ञांचा हवाला देत रतन टाटांनी अनेक मुद्दे खोडून काढल्याचा या मेसेजमध्ये उल्लेख करण्यात आला असून, तो मजकूर असलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पण तसं काहीच रतन टाटांनी लिहिलेलं नसल्याचं आता समोर आलं आहे. अशा प्रकारचा कोणताही मजकूर मी लिहिलेला नाही, तसेच मी असं कुठेही सांगितलेलं नसल्याचाही त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून खुलासा केला आहे.“या पोस्टमधील गोष्टी मी कधीच सांगितलेल्या अन् लिहिलेल्या नव्हत्या. व्हॉट्सअ‍ॅप आणि सोशल मीडियावर शेअर होणारी माहिती एकदा तपासून पाहा, अशी विनंती मी आपल्याला करतो. मला काही सांगायचं असल्यास मी ते माझ्या अधिकृत माध्यमांद्वारेच तुमच्यापर्यंत पोहोचवेन, तुम्ही सुरक्षित असल्याची अपेक्षा करतो. काळजी घ्या,” असं ट्विट रतन टाटांनी केलं आहे. रतन टाटांच्या फोटोसह इंग्रजीमध्ये काही मजकूर लिहिलेला हा फोटो व्हायरल होत आहे. अनेकांनी तो शेअरही केला आहे. त्या मेसेजमध्ये लिहिलं आहे की, कोरोनामुळे अर्थव्यवस्था रसातळाला जाईल असं तज्ज्ञ सांगतात. पण हे तज्ज्ञ कोण आहेत, यासंदर्भात मला काहीच माहिती नाही. या तथाकथित तज्ज्ञांना मनुष्याची इच्छाशक्ती अन् प्रेरणेबद्दल ठाऊक नसावं, असं मला वाटतं.तज्ज्ञांच्या मते, दुसऱ्या महायुद्धानंतर जपानला काहीच भविष्य नव्हतं. मात्र जपानने अवघ्या तीन दशकांमध्ये अमेरिकेलाही उद्योगाच्या स्पर्धेत रडवल्याचं दिसलं. तज्ज्ञांवर भरवसा ठेवल्यास अरबांनी इस्राएलला जगाच्या नकाशावरून मिटवायला हवं होतं. पण तसंसुद्धा झालं नाही. तज्ज्ञांच्या मतानुसार, आपण १९८३च्या विश्वचषकामध्ये कुठेच नव्हतो,” अशा अनेक प्रकारची उदाहरणं दाखल्यांनुसार या मेसेजमध्ये दिलेली आहेत. आपण कोरोनाला हरवून भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा प्रगतिपथावर येईल,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केल्याचं या मेसेजमध्ये नमूद आहे. 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस