Join us  

coronavirus: लॉकडाऊनमुळे जीडीपीचे होऊ शकते १.५ लाख कोटींचे नुकसान, महाराष्ट्राला सर्वाधिक फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2021 4:37 PM

coronavirus Lockdown News : कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे देशातील काही राज्यांत पूर्ण लॉकडाऊन तर काही राज्यांमध्ये अंशत: लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. मात्र या लॉकडाऊनचा या राज्यांसह देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसू शकतो

नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेने अक्राळविक्राळ रूप घेतल्याने देशात चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. (coronavirus in India) कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे देशातील काही राज्यांत पूर्ण लॉकडाऊन तर काही राज्यांमध्ये अंशत: लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. मात्र या लॉकडाऊनचा या राज्यांसह देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसू शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. (Lockdown in Maharashtra) लॉकडाऊनमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचे (Economy) १.५ लाख कोटी रुपयांचे नुकसान होऊ शकते. तसेच यामधील ८० टक्के नुकसान हे महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि राजस्थान या तीन राज्यांचे होईल, अशी शक्यता एसबीआय रिसर्चच्या एका अहवालातून वर्तवण्यात आली आहे. ( Lockdown could hurt GDP by Rs 1.5 lakh crore, Maharashtra hit hardest )

एसबीआय़च्या या अहवालात म्हटले आहे की, विविध राज्यांमध्ये सध्या लॉकडाऊनमुळे जे नुकसान होण्याची शक्यता आहे त्यामध्ये सर्वाधिक वाटा हा एकट्या महाराष्ट्राचा असेल. लॉकडाऊनमुळे होणाऱ्या एकूण नुकसानीपैकी तब्बल ५४ टक्के नुकसान हे महाराष्ट्राचे होईल. 

एसबीआयच्या रिसर्च रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, आमच्या सध्याच्या अंदाजानुसार लॉकडाऊनमुळे केवळ महाराष्ट्रामध्येच ८२ हजार कोटी रुपयांचे नुकसान होईल. जर निर्बंध वाढले तर ते अधिक वाढू शकते. दुसरीकडे मध्य प्रदेशमध्ये सुमारे २१ हजार ७१२ कोटी रुपयांचे नुकसान होऊ शकते. तर राजस्थानमध्ये सुमारे १७ हजार २३७ कोटी रुपयांच्या नुकसानीचा अंदाज आहे. 

कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे समोर येत असलेल्या मोठ्या प्रमाणावरील रुग्णांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र आणि एनसीआरच्या काही भागांमध्ये काही दिवसांसाठी लॉकडाऊन किंव अंशत: लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. महाराष्ट्रामध्ये आता लॉकडाऊनची घोषणा झाली आहे. तर मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या काही शहरांमध्येसुद्धा कठोर निर्बंध लादले गेले आहेत.  मध्य प्रदेशच्या १५ जिल्ह्यात लॉकडाऊन सुरू आहे. तर राजस्थानमध्येही ३ मेपर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आहे. 

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे लागूकरण्यात आलेल्या निर्बंधांमुळे २०२१-२२मध्ये देशाच्या जीडीपीच्या वाढीचा अंदाज घटवून एसबीआयने तो १०.४ टक्क्यांवर आणला आहे. त्याआधी एसबीआयने जीडीपीमध्ये ११ टक्के दराने वाढ होण्याचा अंदाज वर्तवला होता.  

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याव्यवसायमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसअर्थव्यवस्था