Join us  

Coronavirus and Economy: कोरोनानंतर कुठे असेल सेन्सेक्स?; काय सांगतात वॉरेन बफेंचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2020 4:33 PM

Coronavirus News in Marathi : येणाऱ्या काळात शेअरबाजारात आतापेक्षा सुधारणा होणार नाहीत, असे नाही. पण,

ठळक मुद्देयेणाऱ्या काही महिन्यांत शेअरबाजाराचे निर्देशांक आणि उलाढालीचे प्रमाण या दोन्हींत वादळी बदल होत राहतील.कोरोनाचा जागतिक अर्थकारणावर नेमका किती आणि कसा परिणाम झाला आहे, हे कळायला तीन- चार वर्षे तरी जावी लागतील.वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ यांची सांगड घालत काम करत राहणाऱ्या शेअरबाजारात हे फार धोक्याचं आहे.

>> चंद्रशेखर टिळक

दोन-तीन महिन्यांपूर्वीचे आपल्या देशातल्या शेअरबाजाराचे निर्देशांक आणि सध्याचे निर्देशांक यात फारसा फरक नाही, असे म्हणता येईल, अशी परिस्थिती नाही. यात केवळ आकडेवारीचाच नाही, तर मन:स्थितीचाही फरक पडला आहे. त्यामागे कोरोना हे महत्त्वाचे आणि मोठे कारण आहे. येणाऱ्या काळात शेअरबाजारात आतापेक्षा सुधारणा होणार नाहीत, असे नाही. पण, प्रत्येक पातळीवर नफारूपी विक्रीचे तंत्र अवलंबून असण्याबद्दल संस्थात्मक व मोठे वैयक्तिक गुंतवणूकदार दक्ष असतील, हे उघड आहे. त्यामुळे येणाऱ्या काही महिन्यांत शेअरबाजाराचे निर्देशांक आणि उलाढालीचे प्रमाण या दोन्हींत वादळी बदल होत राहतील, हे नक्की!वॉरेन बफेसारख्या जगप्रसिद्ध गुंतवणूकदारांनी अगदी अलीकडेच असे मत व्यक्त केले आहे की, कोरोनाचा जागतिक अर्थकारणावर नेमका किती आणि कसा परिणाम झाला आहे, हे कळायला तीन- चार वर्षे तरी जावी लागतील. वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ यांची सांगड घालत काम करत राहणाऱ्या शेअरबाजारात हे फार धोक्याचं आहे. कारण, इथे प्रत्यक्ष कामगिरी (परफॉर्मन्स) इतकीच त्याबद्दलची मनोभूमिका (परसेप्शन) ही महत्त्वाची असते आणि कोरोनाने निर्माण केलेल्या अनिश्चिततेने त्याबाबत अनेक प्रश्नचिन्हं निर्माण केले आहेत, हे नक्कीच!

अशा अनिश्चित काळात तुमच्या-माझ्यासारख्या सर्वसामान्य गुंतवणूकदारांना नेहमीच औषध- आरोग्य- पायाभूत सुविधा- वित्तीय सेवा अशा ‘डिफेन्सिव्ह’ स्वरूपाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला जातो. कोरोनाने नेमका याच क्षेत्रांत हाहाकार उडवला आहे.

त्यातही, अशा परिस्थितीत अशा क्षेत्रांत मध्यम ते दीर्घकालीन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला जातो. पण, आजच्या परिस्थितीत अशी दीर्घकालीन गुंतवणूक करण्याच्या मन:स्थितीत किती लहान व सर्वसामान्य गुंतवणूकदार खरोखरच असतील? आणि फ्रँकलीन टेंपलटनच्या सहा योजना आताच बंद होणे, सीकेपी बँकेचे बँकिंग लायसन्स आताच रद्द होणे, येस बँकेचा घोटाळा, सरकारी योजनांत व्याजदर कमी होणे, या घटनांचाही परिणाम काही फारसा सकारात्मक असणार नाही.

या सगळ्याच घटना एकाचवेळी घडण्यातून आधीच अनिश्चित असणारे हे क्षेत्र येत्या काही दिवसांत आणखीनच निसरडे असेल. त्यामुळे, ‘जपून टाक पाऊल जरा...’ हेच खरे!(लेखक ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ आहेत.)(संकलन : स्नेहा पावसकर)  

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याशेअर बाजारअर्थव्यवस्था