Join us  

Coronavirus: कोरोनाच्या विषाणूचा बाजाराला घट्ट विळखा, १०.८९ लाख कोटी रुपयांचा बसला फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2021 8:28 AM

Business News: परकीय वित्तसंस्थांची विक्री आणि कोरोनाचा नवीन विषाणू सापडल्याच्या वृत्ताने बाजाराला  खाली खेचले आहे. खनिज तेलाची घटती विक्री आणि अमेरिकन अर्थव्यवस्थेच्या विकासाबाबत प्रश्नचिन्ह याचाही नकारात्मक परिणाम झाला.

- प्रसाद गो. जोशीपरकीय वित्तसंस्थांची विक्री आणि कोरोनाचा नवीन विषाणू सापडल्याच्या वृत्ताने बाजाराला  खाली खेचले आहे. खनिज तेलाची घटती विक्री आणि अमेरिकन अर्थव्यवस्थेच्या विकासाबाबत प्रश्नचिन्ह याचाही नकारात्मक परिणाम झाला. आगामी सप्ताहात बाजारात संमिश्र वातावरण राहण्याची शक्यता आहे. गतसप्ताहात परकीय वित्तसंस्थांकडून विक्रीचा मारा सुरूच होता. त्यांनी २१,१२४.९५ कोटी रुपयांच्या समभागांची विक्री केली.  परकीय वित्तसंस्थांनी ३१,१२४.४६ कोटी रुपये काढून घेतले. 

१०.८९ लाख कोटी रुपयांचा बसला फटका-  शुक्रवारी शेअर बाजारात झालेली प्रचंड घसरण ही चालू कॅलेंडर वर्षातील तिसऱ्या क्रमांकाची मोठी घसरण ठरली आहे. या सप्ताहामध्ये शेअर बाजाराच्या भांडवल मूल्यामध्ये १०,८९,०२४.७४ कोटी रुपयांची घट झाली आहे. सप्ताहाच्या अखेरीस भांडवल मूल्य २,६९,२०,१९६.९९ कोटी रुपयांवरून २,५८,३१,१७२.२५ कोटी रुपयांवर आले आहे. सलग दुसऱ्या सप्ताहामध्ये बाजार भांडवलमूल्य खाली येऊन गुंतवणूकदारांचा तोटा झाला आहे.- सन २०२१ हे वर्ष शेअर बाजारासाठी संमिश्र राहिले आहे. या वर्षामध्ये सेन्सेक्स आणि निफ्टीने सर्वोच्च पातळी गाठली असली तरी मोठ्या घसरणीही बघितल्या आहेत. या वर्षात २६ फेब्रुवारी रोजी बाजारात १९१९.३२ अंशांची झालेली घट ही सर्वोच्च ठरली आहे. त्यानंतर १२ एप्रिल रोजी १७०७.९४ अंशांची तर २६ नोव्हेंबर रोजी १६८७.९० अंशांची घसरण झाली. 

बाजारातील पहिल्या १० पैकी केवळ भारती एअरटेल, पॉवर ग्रीड आणि डॉ. रेड्डीज या तीन कंपन्यांच्या भांडवलामध्ये वाढ झाली आहे. सात कंपन्यांना मात्र तोटा झाला असून त्यामध्ये बजाज फायनान्स, रिलायन्स, इन्फोसिस आणि एचडीएफसी यांचा समावेश आहे.

टॅग्स :शेअर बाजारमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस