Join us  

coronavirus : कोरोनाचा फटका, फ्लिपकार्टने आपली सेवा थांबवली 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2020 9:38 AM

कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या भीषण परिस्थितीचा फटका ऑनलाइन इ कॉमर्स कंपनी असलेल्या फ्लिपकार्टलाही बसला आहे.

नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संपूर्ण देशात लॉकडाऊनची घोषणा केली आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व सेवा बंद करण्यात आल्या आहेत. दरम्यान, कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या भीषण परिस्थितीचा फटका ऑनलाइन इ कॉमर्स कंपनी असलेल्या फ्लिपकार्टलाही बसला आहे. देशात जाहीर झालेल्या संपूर्ण लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर फ्लिपकार्टने आपली सेवा तात्पुरती थांबवण्याची घोषणा केली आहे. 

 ''आम्ही आमची सेवा काही काळासाठी थांबवत आहोत. तुमच्या गरजा या आमच्यासाठी प्रधानक्रमावर आहेत. आम्ही लवकरात लवकर तुमच्या सेवेत परत दाखल होण्याचा प्रयत्न करू हे आमचे वचन आहे.''

लोकांना सुरक्षित राहण्यासाठी एकमेकांपासून वेगळे राहावे लागत आहे. अशी कठीण वेळ यापूर्वी कधी आली नव्हती. आता अशा कठीण वेळी तुम्ही घरीच राहा आणि सुरक्षित राहा, असे आवाहन आम्ही करतो, असे फ्लिपकार्टने आपल्या पत्रकात म्हटले आहे. दरम्यान, कोरोना विषाणूमुळे भारतासमोरही गंभीर आव्हान उभे राहिले आहे. देशात कोरोनाची लागण झालेल्या बाधितांची संख्या 536 पर्यंत पोहोचली आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र  मोदी यांनी देशात 21  दिवस संपूर्ण लॉकडाऊन करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आजपासून 14 एप्रिलपर्यंत देशात लोकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन करण्यात आले आहे. दुसरीकडे यूरोपीय देश आणि अमेरिकेत कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. इटली, स्पेन, फ्रान्स, अमेरिकेत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचा आकडा वाढला आहे. संपूर्ण जगात मिळून कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या लोकांची संख्या 18 हजारांवर पोहोचली आहे.

टॅग्स :फ्लिपकार्टकोरोना वायरस बातम्याभारत