Join us  

coronavirus: या सहा क्षेत्रातील कंपन्यांना बसला नाही लॉकडाऊनचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2020 3:08 AM

कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वच क्षेत्रे ठप्प झाली असली तरी काही क्षेत्रे अशी आहेत, ज्यांना या लॉकडाऊनचा फटका न बसता फायदाच झालेला दिसून येत आहे.

मुंबई : देशामध्ये सुरू झालेला कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वच क्षेत्रे ठप्प झाली असली तरी काही क्षेत्रे अशी आहेत, ज्यांना या लॉकडाऊनचा फटका न बसता फायदाच झालेला दिसून येत आहे. औषधनिर्मिती, रसायने, रिटेल, ई-कॉमर्स, माहिती तंत्रज्ञान आणि खाण या सहा क्षेत्रांमधील कंपन्यांना सध्या चांगले दिवस आलेले दिसत आहेत.लॉकडाऊनमुळे अनेक ठिकाणी आर्थिक उलाढाल थांबलेली दिसून येत असली तरी काही क्षेत्रांना मात्र यापासून फायदा झाला आहे. यापैकी एक महत्त्वाचे क्षेत्र म्हणजे औषधनिर्मिती होय. कोरोनावरील लस शोधून काढण्याची मोहीम सध्या वेगामध्ये आहे. यामध्ये औषधनिर्मिती कंपन्याही हिरिरीने सहभागी झाल्या आहेत. याशिवाय देशामध्ये विविध प्रकारच्या औषधांची मागणीही वाढत असल्याने या कंपन्यांच्या व्यवसायामध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.ई-कॉमर्स कंपन्यांनाही आता चांगले दिवस आलेले बघावयास मिळत आहेत. लॉकडाऊनमुळे बाहेर पडता येत नसल्याच्या काळामध्ये या कंपन्यांनी घरपोहोच वस्तू देण्याचा वेग वाढविला. त्यामुळे तसेच तरुणाईला असलेल्या आॅनलाइन खरेदीच्या क्रेझमुळे या कंपन्यांचा व्यवसाय वाढला आहे.रिटेल उद्योगही आता वेगाने विकसित होताना दिसून येत आहे. वस्तूंची अधिक मागणी ग्राहकांकडून नोंदविली जात असून, या कंपन्याही आता आपल्या वस्तू या ई-कॉमर्स कंपन्यांमार्फत पोहोचविण्याला प्राधान्य देत आहेत. त्यामुळे रिटेल आणि ई-कॉमर्स ही दोन्ही क्षेत्रे हातात हात घालून वाटचाल करीत असलेली बघावयास मिळत आहेत.रसायन उद्योगालाही आता चांगले दिवस येऊ लागले आहे. कोरोनाच्या साथीमुळे सॅनिटायझर्सची मागणी वाढत आहे. यासाठी रसायन उद्योगाला कोणताही पर्याय नसल्याने कोरोनाच्या काळात हे क्षेत्रही बहरताना दिसत आहे.माहिती तंत्रज्ञान क्षेत्राच्या माध्यमातून देशाला मोठ्या प्रमाणावर परकीय चलन मिळत असते. लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये या क्षेत्रातील व्यक्तींना घरून काम करण्याची मुभा देण्यात आल्यामुळे हे क्षेत्र लॉकडाऊच्या काळामध्येही बहरात आहे. खाण क्षेत्रामध्ये आता खासगी उद्योगांनाही संधी मिळत असल्यामुळे या क्षेत्रामध्ये अधिक गुंतवणूक येण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे या क्षेत्रातील कंपन्याही जोरात आहेत.मोबाइल निर्मिती कंपन्यानामध्येही तेजीलॉकडाऊनमुळे सर्वत्र डिजिटल क्रांती येऊ घातली आहे. शाळा-महाविद्यालये बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांना आॅनलाइन क्लासरूमच्या माध्यमातून अभ्यास करावा लागत आहे. यासाठी मुख्य वापर होतोय तो मोबाइलचा. त्यामुळे मोबाइल तसेच टॅबनिर्मिती करणाऱ्या विविध कंपन्यांच्या व्यवसायामध्ये वाढ होत असलेली दिसून आली आहे.ज्या कंपन्या चांगली कामगिरी करताना दिसत आहेत, त्यापैकी भारतामधील प्रमुख कंपन्या म्हणजे रिलायन्स इंडस्ट्रीज आणि नेस्ले या होत. याशिवाय जागतिक स्तरावरील अ‍ॅमेझॉन, मायक्रोसॉफ्ट, अ‍ॅपल, फेसबुक, पेपाल, नेटफ्लिक्स, झूम व्हिडिओ, सॅमसंग बायोलॉजिक्स यांचा समावेश आहे.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याकोरोना सकारात्मक बातम्याव्यवसायभारतअर्थव्यवस्था