Join us

कोरोनाच्या तडाख्यातून सावरतेय अर्थव्यवस्था , तिसरी तिमाही सकारात्मक : रिझर्व्ह बँक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2020 05:44 IST

RBI : रिझर्व्ह बँकेच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या वार्तापत्रात ‘देशाच्या अर्थव्यवस्थेची सद्य:स्थिती’ या विषयावर बँकेतील तज्ज्ञांनी लेख लिहिला आहे. त्यात वरील निरीक्षणे नोंदविण्यात आली.

मुंबई : कोरोनाकाळात सलग दोन तिमाहींमध्ये झालेली घसरण आता भरून निघत असून तिसऱ्या तिमाहीत अर्थव्यवस्था सकारात्मकतेकडे वाटचाल करू लागलेली असेल, असा विश्वास रिझर्व्ह बँकेने व्यक्त केला आहे. कोरोना महासाथीच्या तडाख्यात सापडलेली अर्थव्यवस्था अपेक्षेपेक्षा वेगाने सावरत असल्याचे निरीक्षणही रिझर्व्ह बँकेने नोंदविले आहे.रिझर्व्ह बँकेच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या वार्तापत्रात ‘देशाच्या अर्थव्यवस्थेची सद्य:स्थिती’ या विषयावर बँकेतील तज्ज्ञांनी लेख लिहिला आहे. त्यात वरील निरीक्षणे नोंदविण्यात आली. मार्चपासून देशात कोरोनाचा कहर सुरू झाला. त्यामुळे आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत अर्थव्यवस्थेची तब्बल २३.९ टक्के अशी ऐतिहासिक घसरण झाली. दुसऱ्या तिमाहीत ही घसरण ७.५ टक्क्यांपर्यंत आली. अर्थव्यवस्था यंदा आकुंचित पावेल, असा अंदाज वर्तविण्यात येत होता. परंतु, सप्टेंबरच्या मध्यापासून देशातील कोरोनास्थिती झपाट्याने सुधारू लागली. कोरोनाबाधितांचा आलेख घसरणीला लागला.  टाळेबंदीही शिथिल झाली. परिणामी, तिसऱ्या तिमाहीत अर्थव्यवस्थेची सकारात्मकतेकडे वाटचाल सुरू झाली असून, त्याची सुचिन्हे दिसू लागली असल्याचे उपरोल्लेखित लेखात नमूद करण्यात आले आहे. तिसऱ्या तिमाहीत राष्ट्रीय सकल उत्पादनात (जीडीपी) वाढ होईल, असा आशावादही या लेखात व्यक्त करण्यात आला आहे.

दुसरी लाट न आल्याने स्थितीत सुधारणा- कोरोना महासाथीची आणखी एक लाट येईल व ती भयंकर असेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. मात्र, देशात कोरोनाची दुसरी लाट आली नाही व अर्थव्यवस्थेला चालना मिळाली. - टाळेबंदीच्या काळात सरकारतर्फे वेळोवेळी राबविण्यात आलेल्या आर्थिक उपाययोजनांमुळेही अर्थव्यवस्थेची गती सुधारण्यास मदत झाली, असेही या लेखात म्हटले आहे.

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँक