Join us  

ग्राहकांमध्ये ट्रायच्या नव्या केबल नियमावलीबाबत संभ्रमावस्था

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2019 4:31 AM

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) केबल व्यवसायाबाबत नवीन नियमावली जाहीर केल्यापासून या निर्णयाच्या विरोधात व समर्थनार्थ अशा दोन्ही बाजूंनी जोरदार वाद-प्रतिवाद केला जात आहे.

मुंबई : भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) केबल व्यवसायाबाबत नवीन नियमावली जाहीर केल्यापासून या निर्णयाच्या विरोधात व समर्थनार्थ अशा दोन्ही बाजूंनी जोरदार वाद-प्रतिवाद केला जात आहे. मात्र, ही नियमावली लागू करण्याची मुदत जवळ आली असताना प्रत्यक्षात त्याच्या अंमलबजावणीबाबत कोणतीही हालचाल दिसत नसल्याने ही नियमावली नेमकी कधी लागू होणार याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.ट्रायच्या नियमावलीमुळे ग्राहकांना लाभ होईल व सध्यापेक्षा कमी किमतीत त्यांना मनाजोगत्या वाहिन्या पाहता येतील, असा दावा ग्राहक संघटनांतर्फे केला जात आहे. तर, या नियमावलीमुळे ग्राहकांना लाभ होणार नसून केबल चालक मात्र देशोधडीला लागणार असल्याची भीती केबल चालकांमधून व्यक्त होत आहे. त्यामुळे ही नियमावली प्रत्यक्षात कधी लागू होणार याबाबत उत्कंठा आहे.नियमावलीनुसार, ग्राहकांनी त्यांच्या केबल चालकांना आपल्या आवडीच्या वाहिन्यांची यादी अर्ज भरून देणे गरजेचे आहे. मात्र, प्रत्यक्षात केबल चालकांच्या नफ्याच्या मुद्द्यावरून निर्णय होत नाही तोपर्यंत केबल चालकांनी असा अर्ज भरून घेण्यास नकार दिलेला आहे. त्यामुळे ग्राहकांना आवडीच्या वाहिन्या पाहण्याबाबत कोणतीही माहिती पुढे सरकलेली नाही.केबल आॅपरेटर्स अ‍ॅण्ड डिस्ट्रिब्युटर असोसिएशनने याबाबत केंद्रीय प्रसारण राज्यमंत्री यांची भेट घेतली होती व त्यांनी केबल चालकांचे म्हणणे ऐकून नियमावलीत बदल करण्याची ग्वाही दिल्याचा दावा कोडाने केला होता. त्यामुळे नियमावलीत बदल होईपर्यंत ट्रायला सहकार्य न करण्याची भूमिका केबल चालकांनी घेतली आहे.

टॅग्स :टेलिव्हिजन