Join us  

रेल्वे तिकीटाच्या दरात विमान प्रवास करण्याचं लक्ष्य; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला प्लान! 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2021 9:27 PM

पेट्रोल आणि डिझेलवरील करात कपात केल्यानंतर आता केंद्र सरकार एटीएफ म्हणजेच विमान इंधनावरील कर कमी करण्याच्या तयारीत आहे.

पेट्रोल आणि डिझेलवरील करात कपात केल्यानंतर आता केंद्र सरकार एटीएफ म्हणजेच विमान इंधनावरील कर कमी करण्याच्या तयारीत आहे. देशातील सात राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी विमान इंधनावरील वॅटमध्ये घट करुन ४ टक्क्यांपेक्षा कमी केलं आहे, अशी माहिती केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिली आहे. 

"उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, हरियाणा, मध्य प्रदेश, जम्मू-काश्मीर, लडाख आणि अंदमान निकोबरनं विमान इंधनावरील वॅट कमी करुन १ ते ४ टक्क्यांमध्ये आणला आहे. सध्या देशातील एकूण २२ हून अधिक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये वॅट चार टक्क्यांहून अधिक आहे. या राज्यांच्या मुख्यमंत्री आणि राज्यपालांना पत्र लिहून विमान इंधनावरील वॅट कमी करण्याची मागणी केली आहे", असं ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले. 

"आमची थेट स्पर्धा रेल्वेशी आहे. विमान प्रवासाचा दर इतका कमी असावा की सेकंड क्लासमधून प्रवास करणाऱ्यांनाही सहज विमानानं प्रवास करता यावा असा माझा प्रयत्न आहे. यासाठी करात कपात करणं गरजेचं आहे आणि या दृष्टीनं आम्ही वेगानं काम करत आहोत", असं ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले. 

एअर इंडियाच्या निर्गुंतवणुकीचं काम येत्या जानेवारीपर्यंत पूर्ण होईल याचीही माहिती शिंदे यांनी यावेळी दिली. निर्गुंतवणुकीसाठीच्या प्रक्रिया अतिशय जटील असतात आणि त्यांना टाळता येत नाही. डिसेंबरचा शेवट किंवा येत्या जानेवारी महिन्यात एअर इंडियाचं निर्गुंतवणुकीचं काम पूर्ण होईल. त्यासाठी सर्व प्रक्रिया कायदेशीररित्या पार पाडली जाईल, असं ज्योतिरादित्य म्हणाले. 

टॅग्स :ज्योतिरादित्य शिंदेएअर इंडिया