Join us  

Chinese Loan App Case: Paytm, Cashfree आणि Razorpay च्या कार्यालयांवर ईडीचा छापा, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2022 5:26 PM

Chinese Loan App Case: ईडीनं शुक्रवारी चिनी लोन अॅप्सशी निगडीत प्रकरणी फिनटेक कंपन्यांच्या सहा ठिकाणी छापे टाकले.

Chinese Loan App Case: केंद्रीय तपास यंत्रणा ईडीने शुक्रवार २ सप्टेंबर रोजी चिनी लोन अॅप्सच्या संदर्भात फिनटेक कंपन्यांच्या सहा ठिकाणी छापे टाकले. सक्तवसूली संचालनालयाने (ईडी) बंगळुरूमधील आघाडीच्या फिनटेक कंपन्यांच्या रेझरपे (Razorpay), कॅशफ्री पेमेंट्स (Cashfree Payments) आणि पेटीएम पेमेंट सर्व्हिसेसच्या (Paytm Payment Services) सहा कार्यालयांवर शोधमोहीम राबवली. आतापर्यंत मर्चंट आयडी आणि चिनी कंपन्यांच्या बँक खात्यांमधून १७ कोटी रुपये जप्त करण्यात आले असल्याची माहिती ईडीकडून देण्यात आली. केंद्रीय तपास यंत्रणेची शोध मोहीम अजूनही सुरू आहे.

ईडीने यासंदर्भात एक निवेदन जारी केले आहे. जारी केलेल्या निवेदनानुसार, ही कारवाई मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा (PMLA), 2002 च्या तरतुदींनुसार करण्यात आली आहे. या कारवाईअंतर्गत एका चिनी व्यक्तीशी संबंधित कंपन्यांचाही शोध घेण्यात आला.

काय आहे प्रकरण?बेंगळुरूतील सायबर क्राइम पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या अनेक एफआयआर संदर्भात ही कारवाई करण्यात आली. लोकांनी मोबाईल अॅप्सद्वारे काही कंपन्यांकडून किंवा व्यक्तींकडून अल्प रकमेचे कर्ज घेतले होते. ज्यानंतर त्यांना त्रासाला बळी पडावे लागले. याबाबत एफआयआर दाखल करण्यात आला. त्यानंतर शुक्रवारी ईडीने या प्रकरणी शोधमोहीम राबवली.

नोंदणी नसलेल्या आणि बनावट अॅप्सद्वारे डिजिटल कर्ज देण्याचा ट्रेंड मोठा चिंतेचा विषय बनला असून आरबीआयनेही याबाबत चिंता व्यक्त केली आहे. सुमारे दोन वर्षांपूर्वी २०२० मध्ये या डिजिटल अॅप्सवरून चढ्या दराने घेतलेल्या कर्जाच्या वसुलीच्या प्रक्रियेमुळे काही लोकांनी आपला जीवनप्रवास संपवला होता. या डिजिटल अॅप्सचं फंडींग आणि ओरिजिन चीनपर्यंत आहे आणि अशा परिस्थितीत एसएफआयओ, आयबी आणि रॉ द्वारे देखील तपास केला जात आहे. संशयास्पद डिजिटल लोन अॅप्स आणि त्यांची मदत करत असलेल्या करत असलेल्या भारतीयांविरोधात कारवाई केली जात असल्याची माहिती २ ऑगस्ट रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राज्यसभेत दिली होती.

कंपन्यांचं म्हणणं काय?आपल्या काही मर्चंट्सची सुमारे दीड वर्षांपूर्वी ईडीने चौकशी केली होती आणि सध्या सुरू असलेल्या तपासादरम्यान अधिक माहिती मागवण्यात आली होती. ज्यात त्यांना पूर्णपणे सहकार्य करण्यात आलं आहे. कंपनीच्या कार्यशैलीमुळे ते संतुष्ट आहेत, अशी प्रतिक्रिया रेझरपेच्या प्रवक्त्यांकडून देण्यात आली. तर पेटीएम आणि कॅशफ्रीनं या संपूर्ण प्रकाराबद्दल कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

टॅग्स :अंमलबजावणी संचालनालयपे-टीएमबेंगळूर