Join us  

चिनी मालावर बहिष्काराची होतेय मागणी, पण भारतात हजारो कोटींची गुंतवणूक करणार ही चायनिज कंपनी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2020 3:21 PM

सध्या देशभरात चीनविरोधातील वातावरण तापलेले आहे. तसेच देशात चीनविरोधात संतप्त वातावरण असून, चिनी मालाच्या बहिष्कारासाठी मोठ्या प्रमाणावर मोहीम चालवली जात आहे. अशा परिस्थितीतही एक चिनी कंपनी भारतात हजारो कोटींची गुंतवणूक करण्यास सज्ज झाली आहे.

ठळक मुद्देव्हिवो इंडियाने ग्रेटन नोएडा येथे असलेल्या आपल्या कारखान्याची उत्पादन क्षमता वाढवण्याचा घेतला निर्णय त्यासाठी कंपनीकडून सात हजार ५०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार मोबाइल निर्मिती कारखान्याची क्षमता वाढल्यानंतर येथे दरवर्षाला १२ कोटी फोनचे उत्पादन करणे शक्य होणार

नवी दिल्ली - चिनी सैन्याने ल़डाखमध्ये केलेला घुसखोरीचा प्रयत्न आणि त्यानंतर गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक झटापटीत भारतीय लष्कराच्या २० जवानांना आलेल्या वीरमरणामुळे सध्या देशभरात चीनविरोधातील वातावरण तापलेले आहे. तसेच देशात चीनविरोधात संतप्त वातावरण असून, चिनी मालाच्या बहिष्कारासाठी मोठ्या प्रमाणावर मोहीम चालवली जात आहे. सरकारनेही चीनसोबतच्या व्यापारी संबंधांबाबत कठोर भूमिका घेण्याचे संकेत दिले आहेत. अशा परिस्थितीतही एक चिनी कंपनी भारतात हजारो कोटींची गुंतवणूक करण्यास सज्ज झाली आहे.

भारतात चिनी मालावर बहिष्कार टाकण्याच्या होत असलेल्या मागणीचा चिनी मोबाईल कंपनी असलेल्या व्हिवोवर कुठलाही परिणाम झालेला नाही. व्हिवो इंडियाने ग्रेटन नोएडा येथे असलेल्या आपल्या कारखान्याची उत्पादन क्षमता वाढवण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी या कंपनीकडून सात हजार ५०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे.

व्हिवो कंपनीच्या ग्रेटर नोएडा येथे असलेल्या या  मोबाइल निर्मिती कारखान्याची क्षमता वाढल्यानंतर येथे दरवर्षाला १२ कोटी फोनचे उत्पादन करणे शक्य होणार आहे. तसेच भारतामध्ये एक डिझाइन सेंटरची स्थापना आणि पुढील एका वर्षात स्थानिक पुरवठादारांकडून १५ ते ४० टक्के माल खदेरी करण्याची योजना व्हिओ कंपनीने आखली आहे.

व्हिओ हा ब्रँड आणि व्हिवो इंडिया कंपनी हे चीनमधील ग्वांझू येथील बीबीके इलेक्ट्रॉनिक्स समुहांतर्गत काम करतात. या समुहामध्ये भारतातील ओप्पो, वन प्लस, रीयलमी या लोकप्रिय मोबाइल ब्रँडचाही समावेश आहे.  सध्या भारतीय बाजारात शाओमी अव्वल असून, गेल्या काही काळात व्हिओनेही मोठी मुसंडी मारली आहे.

दरम्यान सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर आता चिनी मालावर बहिष्कार घालण्याची मोहीम आणि सरकारकडून घेण्यात येत असलेली आक्रमक भूमिका यामुळे चिनी कंपन्यांविरोधात वातावरण असतानाही व्हिओ इंडिया भारतात गुंतवणूक करण्यास उत्सुक आहे. याबाबत कंपनीचे ब्रँड स्ट्रॅटर्जी डायरेक्टर निपुण मौर्या म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या व्होकल फॉर लोकल मोहिमेचे आम्ही स्वागत करतो. आमचे सर्व फोन मेड इन इंडियाच असतात. आता आम्ही साडे सात हजार कोटींची गुंतवणूक केल्यानंतर ग्रेटर नोएडामधील कारखान्याची मोबाईल निर्मिती क्षमता ३ कोटींवरून वाढून १२ कोटी होणार आहे. तसेच कारखान्याची क्षमता वाढल्याने या कारखान्यात काम करणाऱ्या भारतीय कर्मचाऱ्यांची संख्या वाढून  ५० हजार होणार आहे.

टॅग्स :विवोव्यवसायभारतचीनभारत-चीन तणाव