Join us

भारताला लाल डोळे दाखवणाऱ्या चीनची अर्थव्यवस्था कोलमडली? लोकं पैसे खर्च करायलाच तयार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 14:35 IST

China Economy : चीनची अर्थव्यवस्था गंभीर संकटातून जात आहे. घटत्या वापरामुळे, बेरोजगारीमुळे आणि घसरत्या गुंतवणुकीमुळे देशभर मंदीचे वातावरण आहे.

China Economy : भारतावर कायम कुरघोडी करण्याचा प्रयत्न करणारा चीन स्वतःच अडचणीत सापडला आहे. चीनच्या आर्थिक वाढीचा वेग आता मंदावत असल्याचे दिसून येत आहे. ऑगस्ट महिन्यात देशातील औद्योगिक उत्पादन आणि किरकोळ विक्री या दोन्ही क्षेत्रांनी अपेक्षेनुसार कामगिरी केली नाही. नॅशनल ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक्सच्या आकडेवारीनुसार, ऑगस्टमध्ये औद्योगिक उत्पादन ५.२% ने वाढले, तर जुलैमध्ये ते ५.७% होते. बाजारातील तज्ञांनी ५.७% वाढीचा अंदाज व्यक्त केला होता, त्यामुळे ही आकडेवारी निराशाजनक मानली जात आहे. गेल्या वर्षीच्या ऑगस्टनंतर ही सर्वात कमी वाढ आहे.

घरे खरेदीविना ओस...किरकोळ विक्रीची आकडेवारीही फारशी उत्साहवर्धक नाही. ऑगस्टमध्ये किरकोळ विक्री ३.४% ने वाढली, जी जुलैच्या ३.७% पेक्षा कमी आहे. तज्ञांनी ३.९% वाढीचा अंदाज वर्तवला होता. ग्राहक खर्चातील घसरणीचे मुख्य कारण स्थावर मालमत्ता क्षेत्रातील मंदी आणि रोजगार बाजारातील सुस्ती असल्याचे मानले जात आहे. विशेष करुन पूर्ण झालेले गृहनिर्माण प्रकल्पांकडे लोकांनी पाठ फिरवली आहे.

प्रॉपर्टीच्या किमतींमध्ये सातत्याने होणारी घट आणि रोजगाराच्या संधींची कमतरता यामुळे लोकांची खर्च करण्याची क्षमता आणि इच्छा दोन्हीवर परिणाम झाला आहे. तसेच, व्यावसायिक वर्गाचा विश्वासही कमी झाला आहे. जानेवारी ते ऑगस्ट या काळात मालमत्ता गुंतवणुकीत गेल्या वर्षीच्या तुलनेत १२.९% घट झाली, तर नवीन घरांच्या विक्रीतही ४.७% ची घसरण नोंदवली गेली आहे.

 

बेरोजगारी दरातही वाढचीन सरकारने या परिस्थितीबद्दल सावध भूमिका व्यक्त केली आहे. नॅशनल ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक्सच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, अर्थव्यवस्था सध्या स्थिर असली तरी अनेक अनिश्चित आणि अस्थिर घटक अजूनही कार्यरत आहेत. 'साउथ चायना मॉर्निंग पोस्ट'च्या रिपोर्टनुसार, प्रवक्ते फू लिंगहुई यांनी स्पष्ट केले की, सध्याच्या आर्थिक वातावरणात अनेक धोके आणि आव्हाने आहेत. धोरणकर्त्यांना त्यांनी मॅक्रोइकॉनॉमिक धोरणे मजबूतपणे लागू करण्याचा सल्ला दिला. तसेच, रोजगार, व्यापार आणि ग्राहकांचा विश्वास स्थिर ठेवणे ही प्राथमिकता असायला हवी, असेही त्यांनी सांगितले.

सरकारी आकडेवारीनुसार, ऑगस्टमध्ये शहरी बेरोजगारीचा दर ५.३% वर पोहोचला, जो जुलैच्या ५.२% पेक्षा जास्त आहे. हे दर्शवते की रोजगाराच्या संधी अजूनही मर्यादित आहेत.

टॅग्स :चीनअर्थव्यवस्थामहागाईनोकरी